लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यामध्ये ‘कोरोना’ची भीषणता कायमच असून मंगळवारी ६ हजार ८२६ नवे बाधित आढळले, तर २४ तासात ६५ मृत्यूची नोंद झाली. चाचण्यांची संख्या २९ हजाराहून अधिक गेली असून, शहरातील बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. नागपुरात दिवसभरात साडेचार हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत झालेल्या मृत्यूची एकूण संख्या लक्षात घेता, दोन दिवसात मृत्यू सहा हजाराचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात विक्रमी २९ हजार १२२ नमुन्यांची तपासणी झाली. त्यातील ६ हजार ८२६ लोकांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली. बाधितांमध्ये २ हजार १४४ ग्रामीण भागातील तर हजार ६७५ शहरातील आहेत. मृतांमध्ये २२ जण ग्रामीणमधील तर ३६ जण जिल्ह्यातील आहेत. जिल्हाबाहेरील सात जणांचा समावेश आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ९१ हजार ४३ वर पोहोचली असून, मृत्यूचा आकडा ५ हजार ९०३ वर गेला आहे.
६१ हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण
सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६१ हजार ६२ इतकी झाली आहे. यात शहरातील ३८ हजार ६५७ रुग्णांचा समावेश आहे. विविध रुग्णालयात १४ हजार २४४ ‘पॉझिटिव्ह’ भरती आहेत, तर ४६ हजार ८१८ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत. मंगळवारी ३ हजार ५१८ रुग्ण ठीक झाले. शहरात एकूण १७ हजार ३८६ तर ग्रामीणमध्ये ११ हजार ७३६ नमुने तपासण्यात आले.