सावनेर/हिंगणा/नरखेड/उमरेड/काटोल/कुही/रामटेक/कळमेश्वर/कामठी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरानाबाधितांच्या संख्येत मंगळवारी मोठी वाढ झाली. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ६६४ रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. असे असतानाही ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होताना दिसत आहे.
हिंगणा तालुक्यात ५८३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ६६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे २४, निलडोह (१७), हिंगणा (१०), डिगडोह (७), इसासनी (३), गणेशपूर, मोहगाव, रायपूर व गिरोला येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ४,७३९ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४,०१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १०७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
नरखेड तालुक्यात ३४ रुग्णांची आणखी भर पडली आहे. यातील ९ रुग्ण शहरातील तर २५ ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३६, तर शहरातील ४१ झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जलालखेडा येथे १३, प्राथमिक आरोग्य केंद्र मेढलाअंतर्गत ७, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगा (४), तर प्राथमिक आरोग्य केंद्र, मोवाड येथे एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ३८ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल न.प. क्षेत्रात २४, तर ग्रामीण भागातील १४ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरात जानकीनगर येथे चार, पाॅवर हाऊस (३), सरस्वतीनगर, धंतोली, हत्तीखाना, आयु. डी. पी (२) तर लक्ष्मी नगर, वडपुरा, रेल्वे स्टेशन, पंचशील नगर, फिस्के ले-आऊट, गळपुरा, पंचवटी, थोमा लेआऊट, अनुसयापुरम येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये लाडगाव येथे तीन, मेंडकी, खामली येथे प्रत्येकी दोन; तर परसोडी, येरला, दिग्रस, येनवा, खानगाव, रिधोरा, पारडसिंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २०७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रामटेक तालुक्यात २० रुग्णांची भर पडली. यात शहरातील राजाजी वॉर्ड, रामालेश्वर वॉर्ड, टिळक वॉर्ड, आजाद वॉर्ड व राधाकृष्णा वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात मनसर व क्रांदी माईन येथे प्रत्येकी ४, खैरी बिजेवाडा व हेटीटोला येथे प्रत्येकी २, बोथीयापालोरा, पवनी व गर्रा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १२९७ कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. यातील १०८५ कोरोनामुक्त झाले; तर ४६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उमरेड तालुक्यात मंगळवारी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये ४ रुग्ण उमरेड शहरातील, तर नऊ ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,४०९ झाली आहे. यात शहरातील ८३० तर ग्रामीण भागातील ५७९ रुग्णांचा समावेश आहे. आतापावेतो ४६ जणांचा मृत्यू झाला असून १,२१४ कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तालुक्यात १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये शहरातील ६४ तर ग्रामीण भागातील ७२ रुग्णांचा समावेश आहे.