- आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये समन्वय आवश्यक आहे जेणेकरून दोघेही एकमेकांकडून शिकू शकतील आणि देशाच्या धोरणात्मक क्षमता मजबूत करू शकतील. असे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या नागपूर येथील मुख्यालयाला भेट दिली आणि कंपनीने विकसित केलेल्या संरक्षण उत्पादनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत सोलर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल आणि इतर वरिष्ठ नौदल अधिकारी होते.
यावेळी अॅडमिरल त्रिपाठी यांनी सोलर इंडस्ट्रीजच्या तांत्रिक प्रगतीचे कौतुक करीत सांगितले की गेल्या १४-१५ वर्षांत कंपनीने संरक्षण उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. यावेळी कंपनीचे अध्यक्ष नुवाल म्हणाले की, नौदल प्रमुखांसमोर ड्रोन, मानवरहित हवाई प्रणाली (युएएस) आणि 'भार्गवस्त्र' नावाची काउंटर-ड्रोन प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सध्या सर्वात जास्त गरज लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची आहे आणि कंपनीने या संदर्भात प्रस्ताव आधीच सादर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलर ग्रुपची उपकंपनी असलेल्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने पोखरण फायरिंग रेंज येथे त्यांच्या हायब्रिड व्हीटीओएल यूएव्ही 'रुद्रास्त्र' ची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल आवश्यकतांनुसार घेण्यात आली, ज्यामध्ये उभ्या उड्डाण, उच्च सहनशक्ती, अचूक लक्ष्य संलग्नता आणि मिशन लवचिकता यासारख्या पॅरामीटर्सचा समावेश होता.- नौदल प्रमुखांच्या समोर रुद्रास्त्र ने भरले उड्डाणयावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासमोर रुद्रास्त्र' ने ५० किमी पेक्षा जास्त अंतरावर उड्डाण केले. अचूक रिअल-टाइम व्हिडिओ लिंक मिळवली आणि लक्ष्यावर घिरट्या घालून यशस्वीरित्या परतले. एकूण पल्ला १७० किमी पेक्षा जास्त होता आणि त्याचा अंदाजे उड्डाण वेळ सुमारे १.५ तास होता. चाचणी दरम्यान, मध्यम उंचीवरून डागण्यात आलेल्या अचूक मार्गदर्शित अँटी-पर्सनल वॉरहेडने लक्ष्यावर एअरबर्स्ट स्फोटाद्वारे प्राणघातक परिणाम दर्शविला. देशाच्या स्वदेशी संरक्षण क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने हे यश एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.