पालकमंत्री : प्रतापनगर माध्यमिक शिक्षकांचे निवृत्तिवेतन प्रकरण नागपूर : प्रतापनगर माध्यमिक शिक्षकांच्या निवृत्ती वेतन प्रकरणात शिक्षकांवर अन्याय झाला असल्याचे मान्य करीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे बैठक बोलावून शिक्षकांना न्याय देऊ, असे आश्वासन दिले. या बैठकीला आमदार अनिल सोले उपस्थित होते. या विद्यालयाचे अनेक शिक्षक १९९९ पासून विद्यालयात कार्यरत आहेत. १ जुलै २००४ पासून शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने ६० टक्के अनुदान मंजूर केले. २००५ मध्ये ८० टक्के अनुदान प्राप्त झाले. उर्वरित २० टक्के अनुदान १ जुलै २००६ ला प्राप्त झाले. पण शिक्षण विभागाने अचानक परिपत्रक काढून ज्या शाळांना नोव्हेंबर २००५ पर्यंत १०० टक्के अनुदान प्राप्त झाले आहे, अशाच शाळांच्या शिक्षकांना निवृत्तीवेतन मिळेल. वास्तविक हे परिपत्रक शासनाने काढलेले नव्हते. या परिपत्रकामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. काही शिक्षक या परिपत्रकाच्या विरोधात न्यायालयात गेले. न्यायालयातून त्यांना दिलसा मिळाला व निवृत्ती वेतन सुरू झाले. शिक्षण विभागाने आपली चूक सुधारली नाही. शासनाचे निर्देश नसतानाही शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे अनेक शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला. शिक्षकांची संपूर्ण बाजू ऐकून घेतल्यानंतर वस्तुस्थिती पालकमंत्र्यांच्या लक्षात आली व शिक्षण मंत्र्यांकडे या प्रकरणी आपण बैठक घेऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शिक्षकांच्या या मागणीसंदर्भात आमदार अनिल सोले यांनीही मुख्यमंत्र्यांना कळविले होते. या बैठकीला अनेक शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
शिक्षणमंत्र्यांकडे बैठक बोलावणार
By admin | Updated: January 28, 2016 03:10 IST