लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिनाभरापासून शहरातील सर्वच भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना व हॉटस्पॉट भागात कंटेन्मेंट झोन निर्माण करण्याची गरज असतानाही याची दखल घेतली नाही; परंतु केंद्रीय आरोग्य पथक नागपुरात दाखल होताच मनपा प्रशासन सक्रिय झाले. हॉटस्पॉट भागात टिन ठोकून परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू केली.
केंद्रीय पथक पाहणी करणार असलेल्या प्रभाग क्र.३० मधील बिडी पेठ, प्रभाग २८ मधील सर्वश्रीनगर दिघोरी, प्रभाग २६ मध्ये सरजू टाऊन वाठोडा कंटेन्मेंट निर्माण केले. पथकाने या परिसराची शुक्रवारी पाहणी केली. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची कोरोना चाचणी करणे, नागरिकांना झोनमधून बाहेर जाण्यावर प्रतिबंध लावणे तथा सर्वेक्षण करणाऱ्या टीमला बाधितांचे ऑक्सिजनचे प्रमाण तसेच तापमान तपासण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय आरोग्य पथकामध्ये दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. हर्षल साळवे व नागपूर एम्सचे डॉ.पी.पी.जोशी यांचा समावेश आहे. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत होते.
कोरोना साखळी खंडित करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसची गरज आहे; परंतु शहरातील बाधितांची संख्या व मनपाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी नियुक्त केलेली १५१ पथके विचारात घेता बाधितांशी संपर्क करणे शक्य नाही. केंद्राच्या पथकाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसवर भर देण्याचे निर्देश दिले.
...
शहीद चौक परिसरात बंदोबस्त
वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहीद चौक, इतवारी परिसरात शनिवारी ठिकठिकाणी मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी बॅरिकेट्स लावून विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर कारवाई केली.