नागपूर : संविधान हे आम्हा सर्वांसाठी एक पवित्र पुस्तक असून त्याचे सर्वांनी वाचन व पालन करावे, असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी येथे केले.
जीएसटी, सेंट्रल एक्साईज अॅण्ड कस्टम एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनच्या वार्षिक सभेत मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सीजीएसटीचे मुख्य प्रधान आयुक्त एच.आर. भीमाशंकर, असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय थूल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सभेचे आयोजन जीएसटी भवन, सिव्हील लाईन्स येथे करण्यात आले. असोसिएशनने कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी कार्यरत राहावे, असे खोडे यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर हे ऐक्याचे प्रतीक असल्याचे मत एच.आर. भीमाशंकर यांनी व्यक्त केले.
स्वतंत्र कामगार युनियनचे अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी असोसिएशनचे महत्त्व आणि ट्रेड युनियन क्षेत्रातील कार्याची माहिती दिली. धीरज पाटील यांनी गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संजय थूल म्हणाले, सीजीएसटी प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांविरुद्ध लहरीपणाने कारवाई करू नये. विभागाने कर्मचाऱ्यांविरुद्ध असलेल्या केसेस सहानुभूतीने निकाली काढाव्यात.
कार्यक्रमात ट्रेड युनियन क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी जे.एस. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी धीरज पाटील, उपाध्यक्ष एस.डी. माधवी व सी.आर. साखरे, महासचिव अजय थूलकर, सहसचिव एस.पी. सेलूकर व संजय मेश्राम, कोषाध्यक्ष सिद्धार्थ जनबंधू, कार्यालयीन सचिव माया पाटील, कार्यकारी सदस्य श्रद्धा पाटील, नीलेश बोरकर, टी.बी. कुमरे, एन.एस. मौंदेकर, चंदनसिंग यादव, अनिल यादव, हिमांशु भारती, सारिका डोंगरे आणि राजकुमार तितरे यांचा समावेश आहे. संचालन नरेंद्र मौंदेकर यांनी तर माया पाटील यांनी आभार मानले. सभेत मान्यवर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.