नागपूर : शेतकऱ्यांना बँकेकडून पेरणीसाठी कर्ज मिळालेले नाही. राज्य सरकारने कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा केली, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. सावकाराचे शेतकऱ्यांकडे असलेले कर्ज माफ करण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात ही रक्कम सावकाराला चुकविली नाही. चारही बाजूने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस ‘संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलन’ करणार आहे.माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथे २७ जून रोजी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे या आंदोलनाची घोषणा करतील. त्यानंतर तालुका, जिल्हा व राज्यभर आंदोलन केले जाईल. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात सुरू होत आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. सरकारने गेल्या अधिवेशनात मदत जाहीर केली होती. हेक्टरी साडेचार हजार रुपयांची मदत ती देखील फक्त एक हेक्टरपर्यंत देण्यात आली. बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही तर बँकेवर कारवाई करू, अशी घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला. यावेळी माजी मंत्री नितीन राऊत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव मुन्ना ओझा, तानाजी वनवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलन
By admin | Updated: June 25, 2015 03:01 IST