पुल्लरमध्ये एका जागेवर ईश्वर चिठ्ठी : मोखाबर्डीत कुणालाही बहुमत नाही
भिवापूर : तालुक्यात तीन ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात दोन ग्रामपंचायतीत काँग्रेस समर्थित पॅनलचा वरचष्मा, तर एका ग्रामपंचायतीत कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. पुल्लर ग्रामपंचायतीत एका जागेवर दोन्ही महिला उमेदवारांना सारखी मते मिळाल्याने येथे ईश्वर चिठ्ठीने उमेदवाराचे भाग्य ठरले. तिन्ही ग्रामपंचायतीत प्रत्येकी नऊ जागा अशा एकूण २७ जागांसाठी ७३ उमेदवार रिंगणात होते. पुल्लर व आलेसूर येथे काँग्रेस विरुद्ध भाजप, तर मोखाबर्डी येथे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा सामना झाल्याने येथे भाजप समर्थित पॅनलने जास्त जागांवर विजय मिळविला आहे. आलेसूरमध्ये नऊपैकी सहा जागांवर काँग्रेस समर्थित पॅनलचे उमेदवार विजयी झाले, तर केवळ तीन जागांवर भाजप समर्थित पॅनलला समाधान मानावे लागले. पुल्लरमध्ये नऊ पैकी सहा जागांवर काँग्रेस समर्थित पॅनलचे उमेदवार विजयी झाले, तर केवळ तीन जागांवर भाजप समर्थित पॅनलचा रथ थांबला. येथे सर्वसाधारण महिलांकरिता राखीव असलेल्या वाॅर्ड क्र. २ मध्ये एकाच जागेवर भाजप समर्थित वैशाली धनराज ढोणे व ज्योती श्रीकृष्ण कोल्हे या दोन महिला रिंगणात होत्या. दोघींना प्रत्येकी २६५ असे सारखे मतदान मिळाले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठीने उमेदवाराचे भाग्य ठरविले. यात ज्योती श्रीकृष्ण कोल्हे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. मोखाबर्डी येथे काँग्रेस, भाजपसह काँग्रेसचे असंतुष्ट नेते माजी उपसभापती वसंता ढोणे यांचे स्वतंत्र पॅनल रिंगणात होते. त्यामुळे येथे झालेल्या तिहेरी लढतीत भाजप समर्थित पॅनलला चार जागा, काँग्रेस समर्थित पॅनलला ३ तर ढोणे यांच्या पॅनलला दोन जागा मिळाल्यात. तिन्ही ग्रामपंचायतीच्या एकूण २७ जागांपैकी काँग्रेसला १५, तर भाजपला १० जागा मिळाल्या. अन्य दोन जागांवर ढोणे यांच्या पॅनलला यश मिळाले.
महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनल 'महाविकास आघाडी'चा नारा घेऊन मैदानात उतरल्यामुळे त्याचा काहीसा फटका भाजपला बसला. निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जि.प. सदस्य शंकर डडमल, सभापती विठ्ठल राऊत, बंडू ढाकुणकर, किरण नागरिकर, बाळू इंगोले, संतोष देवाळकर, भक्तदास चुटे, वैभव लाखे, दिलीप गुप्ता, विजय वराडे आदी उपस्थित होते, तर भाजपच्या जल्लोषात नगरसेवक आनंद गुप्ता, चरणजीतसिंग अरोरा, विवेक ठाकरे, अविनाश चिमुरकर, हिमांशू अग्रवाल, अमन अरोरा, धनंजय चौधरी आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र राठोड, ठाणेदार महेश भोरटेकर आदी मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभागी होते.