नागपूर : कार अनियंत्रित झाल्यानंतर संतप्त झालेल्या युवकांनी गोंधळ घालून एकमेकांना जखमी केले. वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यूसमोर झालेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रतापनगर पोलिसांनी या घटनेत सात आरोपींना अटक केली आहे. यात गौरव गजानन पाटील (२८) रा. बेलतरोडी, कल्पेश सुधाकर हिवाळे (२६) रा. राहुलनगर, आशिष दिलीप गजभिये (७) रा. मकरधोकडा, राहुल लक्ष्मण लांबट (२४) रा. नरसाळा, स्वप्निल दिलीप गजभिये (२९) रा. खरबी, सम्यक भीमराव गजभिये (१९) रा. भगवाननगर आणि मेघराज बापुराव गवकरे (३२) रा. वाठोडा यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री १२.४५ वाजता सम्यक गजभिये आणि स्वप्निल गजभिये कारमध्ये स्वार होऊन वर्धा मार्गावरून परत येत होते. त्यांची कार अनियंत्रित झाल्यामुळे डिव्हायडरला धडकली. कारच्या धडकेमुळे बाईकवर असलेला राहुल सोमकुवर जखमी झाला. दरम्यान सम्यक आणि स्वप्निलने आपल्या मित्रांना तेथे बोलावले. नशेत असल्यामुळे त्यांच्यात मारपीट झाली. चौकात ही घटना घडल्यामुळे प्रतापनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलीस निरीक्षक पेठे आणि त्यांचे सहकारी आरोपींची समजूत घालत होते. परंतु आरोपी हिंसक होऊन पोलिसांशीच वाद घालू लागले. पोलिसांसोबत अभद्र व्यवहार करून त्याचे चित्रीकरण करीत होते. पोलिसांना फसविण्याची धमकी देऊ लागले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने तेथे पोहोचले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध दंगा, मारपीट, शिवीगाळ करणे, धमकी देणे आदी गुन्हे दाखल केले आहेत.
...............