चौथ्या दिवशीही रस्त्यावर : मोर्चास्थळी तणावपूर्ण वातावरण नागपूर : मागील चार दिवसांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यांवर तळ ठोकून बसलेल्या संगणक परिचालकांच्या मागण्यांवर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे मोर्चेकरी अधिकच आक्रमक झाले असून, शुक्रवारी दिवसभर मोर्चास्थळी तणावाचे वातावरण होते. गुरुवारी रात्री मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे ओएसडी व ग्रामविकास मंत्र्यांच्या सचिवांशी चर्चा करू न त्यांच्यापुढे भूमिका मांडली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत मागण्यांवर कोणता तरी ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु रात्री ९.३० वाजतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेत, सरकारविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली होती. दरम्यान संघटनेचा सोलापूर येथील जिल्हाध्यक्ष राहुल पेठकर व माजलगाव येथील सिद्घेश्वर तौर या तरुणांना चक्कर आल्याने ते कोसळले. यामुळे चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर लगेच दोन्ही तरुणांना पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. दुसरीकडे संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सर्व मोर्चेकऱ्यांना रात्रभर रस्त्यावर बसण्याचे आवाहन केले. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत सर्व मोर्चेकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर बसले होते.
संगणक परिचालक आक्रमक
By admin | Updated: December 19, 2015 02:56 IST