लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे पालन काही प्रमाणात केवळ शहरात केले जात असून, ग्रामीण भागात मात्र या निर्णय व उपाययाेजनांचा फज्जा उडाला आहे. वास्तवात, शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात काेराेना संक्रमणाचा वेग थाेडा अधिक आहे. परंतु या गंभीर प्रकाराकडे कुणीही लक्ष द्यायला व ग्रामीण भागातील नागरिक जबाबदारीने वागायला तयार नाहीत.
सध्या रामटेक शहरात ८९२, तर तालुक्यातील ग्रामीण भागात २,३९४ काेराेना संक्रमित रुग्ण आहेत. या आकडेवारीवरून ग्रामीण भागात काेराेना संक्रमण अधिक असल्याचे स्पष्ट हाेते. मात्र, ग्रामीण भागात सुविधांच्या अभावासाेबत बंधनही फार कमी आहेत. काेराेना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, अशी प्रशासनाने व्यवस्था करणे तसेच संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व त्यांचे संक्रमण पसरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आराेग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जीव धाेक्यात टाकून अहाेरात्र कर्तव्य बजावत आहेत.
रामटेक तालुक्यात एकूण १५६ गावे आहेत. यातील बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात काेराेनाचे रुग्ण आहेत. त्या रुग्णांना याेग्य मार्गदर्शन करायला व त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्येसाेबत मृत्युदरात वाढ हाेत आहे. शिवाय, ग्रामीण भागातील नागरिक कुणाचे काहीही ऐकत नाहीत. त्यांच्या असल्या बेजबाबदार वागण्याला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागात पाेलिसांची गस्त वाढविणे आणि संबंधितांवर माेठी दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.
रामटेक शहरात काेराेना केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, त्यात ऑक्सिजन व औषधांची सुविधा करणे अत्यावश्यक आहे. साेबतच गंभीर रुग्णांवर नागपूर शहरात उपचार करण्याची तसेच त्यांना नेण्यासाठी अद्यावत रुग्णवाहिकांची साेय करणेही गरजेचे आहे. ग्रामीण भागात काेराेना संक्रमित नागरिकांना त्यांच्या घरी गृहविलगीकरणात ठेवण्यापेक्षा त्यांची गावातील शाळा अथवा समाजभवनात कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली व्यवस्था करणे आवश्यक असल्याने काहींनी सांगितले आहे.
...
आराेग्य कर्मचाऱ्यांना लागण
ग्रामीण भागातील नागरिकांसाेबतच आराेग्य विभागाचे कर्मचारी व आशासेविकांना काेराेनाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. खरं तर, हे कर्मचारी सर्वाधिक काळजी घेतात. पंचाळा (बु.) येथील आशासेविका काेराेना संक्रमित असल्याचे आढळून येताच काेराेना तपासणीचे काम अंगणवाडीसेविकेला देण्यात आले. मात्र, सुरक्षा किट देण्यात आली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांंसह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.