नागपूर विद्यापीठ : ‘नॅक’ जाताच वसतिगृहात अस्वच्छतानागपूर : ‘नॅक’ समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’चा परिसर चकाचक झाला होता. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचीदेखील ऐन वेळेवर स्वच्छता करण्यात आली होती. परंतु ‘नॅक’ची पाठ वळल्यावर परत अस्वच्छता दिसून येत असून प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. एकूणच सर्वकाही ‘आॅल इज वेल’चा हा ‘ड्रामा’ केवळ आठवड्याकरिताच होता अशी विद्यार्थ्यांमध्ये भावना आहे.‘नॅक’ समितीच्या पाहणीदरम्यान विद्यापीठाची चांगली प्रतिमा समोर यावी याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. एरवी जिकडे अधिकारी ढुंकूनदेखील पाहत नाहीत अशा पदव्युत्तर वसतीगृहाला चकाचक करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीदेखील विद्यापीठाची बाजू राखण्यासाठी ‘नॅक’ समितीच्या सदस्यांसमोर त्यांच्या समस्या बोलून दाखविल्या नाहीत. परंतु ‘नॅक’ समिती जाऊन आठवडादेखील उलटत नाही तो वसतीगृहाची अवस्था परत खराब व्हायला लागली आहे. येथील स्वच्छतागृहांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली असून पाईपलादेखील गळती लागली आहे. सोबतच परिसरातदेखील अस्वच्छता वाढीस लागली आहे अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.सोबतच वसतीगृहात नवीन वॉटर कूलर लावण्यात आला होता. परंतु त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तो बंद पडला असून यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाकडून याची दखलदेखील घेण्यात आलेली नाही. वसतीगृहात काही महिन्यांअगोदर नवा कोरा टीव्ही मागविण्यात आला. अनेक दिवस बंदच असलेला टीव्ही ‘नॅक’ समितीला दाखविण्यासाठी ठेवण्यात तर आला, परंतु ‘सेट टॉप बॉक्स’च नसल्याने विद्यार्थ्यांना टीव्ही पाहण्याची सोयच उरलेली नाही.‘कॅम्पस’मधील अनेक विभागांची चमकदेखील उतरायला लागली आहे. अनेक विभागांमध्ये ‘नॅक’ समिती गेल्यापासून स्वच्छताच झालेली नाही. काही विभागांत परत पाण्याची समस्या असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. ‘नॅक’चा उत्कृष्ट दर्जा जरी मिळाला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना त्याचा फायदाच काय असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
परत येरे माझ्या मागल्या
By admin | Updated: September 21, 2014 01:14 IST