नागपूर : कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक घडी बिघडली आहे. सध्या अनेकांना मुलांच्या शैक्षणिक खर्चाची चिंता सतावत आहे. ही बाब लक्षात घेता अमरस्वरूप फाऊंडेशन व पुलक मंच परिवार यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तूंचे संकलन सुरू केले आहे. समाजाकडून शैक्षणिक वस्तू मिळवून त्या गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या जात आहेत. या प्रेरणादायी उपक्रमाची प्रशंसा होत आहे.
सामाजिक माध्यमांवर या उपक्रमाची माहिती प्रसारित करून नागरिकांना क्षमतेनुसार शैक्षणिक वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांनी पुस्तके, नोटबुक, पेन, पेन्सिल, स्कूलबॅग इत्यादी शैक्षणिक वस्तू दिल्या आहेत. या वस्तू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. पुलक मंच परिवारचे मनोज बंड यांनी आर्थिक संकटात असलेल्या पालकांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरत असल्याची माहिती दिली. नवीन शैक्षणिक सत्र लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालक मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेत आहे. अशावेळी गरजू पालकांना मदत करणे आवश्यक होते. करिता, हा उपक्रम सुरू करण्यात आला. या माध्यमातून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना नि:शुल्क शैक्षणिक वस्तू पुरविण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.