राज्यातील ५५ हजार औषध विक्रेत्यांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय औषध विक्रेत्यांच्या संघटनेने (एआयओसीडी) संपूर्ण भारतात आणि राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणाऱ्या आॅनलाईन फार्मसी आणि केंद्र सरकारच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक नोटीसच्या विरोधात मंगळवार, ३० मे रोजी संपूर्ण देशात बंदचे आवाहन केले आहे. राज्य केमिस्ट संघटनेचे ५५ हजार औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकादेशीरपणे व्यवसाय सुरू असून याद्वारे नार्कोटिक्स ड्रग्ज, झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, कोडिन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. पण प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान आॅनलाईन औषध विक्रीवर अनेकदा गंभीर बाबींची साशंकता व्यक्त केल्यानंतरही राज्य व प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सरकार देशात ई-फार्मसी आणि ई-पोर्टल लागू करण्याची योजना आखत असल्यामुळे, देशातील व राज्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जगात रशिया, जपान, इटली, चीन यासारख्या प्रगत देशांनी आॅनलाईन फार्मसीचा विचार स्वीकारला नाही. मान्यता दिलेल्या देशामध्ये सायबर क्राईममुळे त्याचे दुष्पपरिणाम समोर आलेले आहेत. परकीय चलनाची गुंतवणक अथवा स्पर्धात्मक व्यावसायिक व्यवस्था यापेक्षाही सामान्य जनतेचे आरोग्य जास्त महत्त्वाचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
आॅनलाईन फार्मसीच्या विरोधात ३० ला बंद
By admin | Updated: May 25, 2017 02:03 IST