दोन हजारांची लाच : एसीबीने बांधल्या मुसक्यानागपूर : वेतन निश्चितीची टिप्पणी तयार करून देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज दुपारी जेरबंद केले. उपेन्द्र शरदचंद्र श्रीवासकर (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. तो विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपिक आहे. कृष्णाजी दोडकू बन्सोड (वय ७२) हे पंचशील हायस्कूल, वैशालीनगर येथे शिक्षक होते. कार्यालयीन परिस्थितीमुळे त्यांच्या वेतननिश्चितीचे प्रकरण प्रलंबित राहिले. कायदेशीर मार्गाने लढा जिंकत त्यांनी अखेर वेतन निश्चितीचा तिढा सोडवला. हे प्रकरण अंतिम टप्प्यात आले. वेतन निश्चितीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे एक टिप्पणी पत्र तयार करायचे होते. हे पत्र बनविण्याचे काम आरोपी उपेंद्र याच्याकडे आहे. त्यामुळे बन्सोड यांनी उपेंद्रकडे हे पत्र तयार करून देण्यासाठी आर्जव विनंती केली. मात्र, दोन हजारांची लाच दिल्याशिवाय हे पत्र तयार करून मिळणार नाही आणि वरिष्ठांकडेही सादर करणार नाही, अशी भूमिका आरोपीने घेतली. त्यामुळे बन्सोड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीचे अधीक्षक प्रकाश जाधव यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाचेचे दोन हजार रुपये घेऊन बन्सोड आरोपी उपेंद्र श्रीवासकर यांच्याकडे गेले. लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने जेरबंद केले. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, अशोक साखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
लिपिक अडकला
By admin | Updated: August 26, 2014 01:06 IST