नागपूर : तीन अंगणवाडी पर्यवेक्षिका व एक मुख्य सेविका यांचे ११,९०,००० रुपयांचे सेवानिवृत्तीचे क्लेम महिला व बालकल्याण विभागाच्या लिपिकाने सूडबुद्धीने थांबविले होते. २०१४ मध्ये त्या निवृत्त झाल्या होत्या. परंतु सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्यास लिपिक टाळाटाळ करीत होता. शेवटी जिल्हा परिषद पेन्शनर महासंघाने उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांची भेट घेऊन लिपिकाकडून देण्यात येत असलेल्या त्रासाबद्दल तक्रारी केल्या असता अधिकाऱ्याने लिपिकाला चांगलेच फटकारत १५ दिवसात क्लेम मंजूर करण्याची ताकीद दिली. कुंदा मौंदेकर, कांता पौनीकर, चंदा पाटील व विमल तिमांडे या महिला २०१३ व २०१४ या काळात निवृत्त झाल्या. त्यांच्या रजा रोखीकरणाचा, गटविमा योजनेचा मंजूर करण्यात आलेला निधी लिपिकाने रोखून ठेवला होता. महासंघाच्या शिष्टमंडळांनी मंगळवारी उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी लिपिकालाही बोलावण्यात आले. त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. कॅफोकडे बिल पाठविले असल्याचे सांगितले. मात्र कॅफोकडे चौकशी केली असता लिपिक तोंडघशी पडला. त्यामुळे अधिकाऱ्याकडून चांगलीच फटकार खावी लागली. शिष्टमंडळात एन.एल. सावरकर, राजेंद्र गंगोत्री, कृष्णा दाढे, शिवराम दाढे, गोविंद कापसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लिपिकाने थांबविले अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे सेवानिवृत्ती क्लेम
By admin | Updated: June 15, 2016 03:16 IST