पत्र धडकले : ३१00 रुपये हमी भाव जाहीर वरोरा : शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाने राज्यात काही महिन्यापूर्वी नाफेडने अनेक केंद्रावर हरभरा खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकर्यांच्या हरभर्याला चांगला भाव मिळाला. मात्र शनिवारी नाफेडने अचानकपणे हरभरा खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात संबंधित कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र देण्यात आले आहे. खरीप हंगामात सततच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. ज्यांनी पेरण्या केल्या, त्यांची पिकेही सडून गेली. रब्बी हंगाम तरी आपल्या हातातून जाऊ नये, याकरिता शेतकर्यांनी मोठे श्रम करून चणा, गहू आदि पिकांची शेतात लागवड केली. पीक हाती येण्याची परिस्थिती असताना अकाली पाऊस, गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या गहू, चणा आदि पिकांची प्रतवारी खराब झाली. पीक मोठय़ा प्रमाणात हाती आले. प्रतवारी खराब झाल्याचा फायदा घेत व्यापार्यांनी अत्यल्प भावाने शेतमालाची खरेदी सुरू केली. शासनाने रब्बी हंगामात हरभर्याला प्रति क्विंटल तीन हजार १00 रुपये भाव जाहीर केला. त्यामुळे शासनाने हमी भावाने हरभरा खरेदी करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली होती. त्यानंतर विलंबाने का होईना, शासनाच्यावतीने नाफेडने हमी भावाने हरभरा खरेदी सुरू केली. मात्र उद्घाटनानंतरही अनेक केंद्रांवर कित्येक दिवस खरेदीच सुरू झाली नाही. त्यानंतर बारदाना नसल्याचे कारण पुढे करून खरेदी बंद ठेवण्यात आली. अशा अनेक कारणांनी नाफेडची हरभरा खरेदी चालू-बंद राहत होती. त्यामुळे आजही शेतकर्यांकडे मोठय़ा प्रमाणात हरभरा शिल्लक आहे. व्यापारी भाव अत्यल्प देत आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला आहे. येत्या काही दिवसांत खरीप हंगामाची तयारी करावयाची आहे. त्यामुळे जो भाव मिळेल त्या दरात शेतकर्यांना हरभरा विकावा लागणार आहे. याबाबत बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला असता, खरेदी शनिवारपासून बंद करण्याबाबत नाफेडचे पत्र मिळाल्याची माहिती देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
राज्यात नाफेडची हरभरा खरेदी बंद
By admin | Updated: May 26, 2014 00:59 IST