अमिताभ पावडे : रामण विज्ञान केंद्रात महात्मा गांधी प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालपणाचे वय शांत बसण्याचे नाही तर प्रश्न उपस्थित करण्याचे आहे. तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ जाणून घ्या आणि मार्गस्थ व्हा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमिताभ पावडे यांनी आज येथे केले.
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त रामण विज्ञान केंद्राच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षाला अनुसरून ‘राष्ट्रपित्याला डिजिटल श्रद्धांजली’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मुलांना उद्देशून ते बोलत होते. याप्रसंगी ग्रीन अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉ. आनंद मांजरखेडे, केंद्राचे प्रभारी प्रकल्प समन्वयक मनोज कुमार पांडा, शिक्षणाधिकारी विलास चौधरी, अभिमन्यू भेलावे उपस्थित होते.
स्वातंत्र्यासोबतच महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण पुढे आलो. मात्र, तो वारसा जपता येत नसल्याने देशात गरिबी आणि पिळवणूक संपलेली नाही. या बाबींचा शोध घेऊन आणि विज्ञानाची कास धरून भविष्याचा भारत घडवायचा आहे, असे पावडे मुलांना म्हणाले.
रामण विज्ञान केंद्रात आयोजित हे प्रदर्शन दररोज सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजतापर्यंत बघता येणार आहे. या प्रदर्शनासाठी वापरलेली सामुग्री गांधीवादी तज्ज्ञ आणि सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या गांधी स्मृती व दर्शन समितीच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. प्रदर्शनात महात्मा गांधींवर आधारित डिजिटल कागदपत्रे, दुर्मीळ प्रतिमा, पत्रे, व्हिडीओ, माहितीपट, वृत्तपत्रांच्या क्लिप्स आदींचा समावेश आहे.
...........