लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेता रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेने पूनम अर्बन सोसायटीत झालेल्या ३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात बुधवारी सकाळी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर ६ वर्षांनी छोटू भोयरला अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेशीमबागमध्ये पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. बँकेच्या संचालक मंडळाने अधिकारी व एजंटच्या मदतीने अनेक नागरिकांना नियम डावलून कर्जे दिली होती.
तसेच भरपूर फायद्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. कर्ज घेणाऱ्या व्यक्तींनीही बनावट कागदपत्र देऊन सोसायटीत अर्ज केले होते.
प्रदीर्घ काळ प्रकरण होते थंडबस्त्यात त्यानंतर २०१९ मध्ये गुंतवणूकदार हर्षवर्धन झंझाड यांनी सक्करदरा ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने एमपीआयडी (महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण अधिनियम) नुसार गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात ११ आरोपींना अटक केली होती. यातील काही आरोपी राजकीय, तर काही सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. छोटू भोयर हे पूर्वी सोसायटीत अध्यक्ष होते. प्रदीर्घ काळ हे प्रकरण थंड बस्त्यात पडलेले होते
आणखी ८ ते १० आरोपींचा पोलिस घेताहेत शोध अटक टाळण्यासाठी छोटू भोयरने न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका खारीज करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने भोयर यांना अटक करण्यासाठी मंगळवारी रात्री त्यांच्या घरी धाड टाकली. परंतु, तो घरी नसल्यामुळे पोलिस परतले. त्यानंतर बुधवारी सकाळी मुंबईवरून परतल्यानंतर छोटू भोयर यांना अटक करण्यात आली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यास २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी ८ ते १० आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती आहे.