नागपूर : मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार ज्योती डे यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी आणि कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा साथीदार अनिल भानुदास वाघमोडे (४२) याला त्याच्या हक्कानुसार व आवश्यक अटींसह अभिवचन रजेवर (पॅरोल) सोडण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.
ही घटना ११ जून २०११ रोजी घडली होती. २ मे २०१८ रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजन व वाघमोडे यांच्यासह इतर काही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वाघमोडे सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने पत्नी गंभीर आजारी असल्याचे कारण सांगून अभिवचन रजा मिळण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी त्याच्या पत्नीचे आजारपण गंभीर नसल्याचे नमूद करून अर्ज खारीज केला. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता विभागीय आयुक्तांचा वादग्रस्त आदेश रद्द करून वाघमोडेला रजा मंजूर केली. वाघमोडेतर्फे ॲड. अरविंदकुमार शर्मा यांनी कामकाज पाहिले.