अंजली घोडवैद्य हिचे अरंगेत्रम : प्रतिभा नृत्य मंदिरचे आयोजन नागपूर : शहरातील नवोदित पण नृत्यकौशल्य आत्मसात केलेल्या अंजली घोडवैद्यच्या भरतनाट्यम नृत्याच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मोहक पदलालित्य, सौंदर्यात्मकता आणि नृत्यातील भावपूर्णता तिने हस्तमुद्रा, उत्कृष्ट नेत्रविभ्रम आणि भावमुद्रांनी रसिकांना जिंकले.त्यामुळे नृत्याचा आशय नेमकेपणाने कलात्मकतेने रसिकांपर्यंत पोहोचला. तालाशी खेळ करीत तिने भरतनाट्यम नृत्य सादर करताना पदविन्यास, मुद्रांनी रसिकांना जिंकले. अंजली लोकमत परिवारातील सदस्य ज्येष्ठ एचआर व्यवस्थापक विवेक घोडवैद्य यांची कन्या आहे. प्रतिभा नृत्य मंदिरच्यावतीने भरतनाट्यमच्या परंपरेप्रमाणे तिच्या पहिल्या नृत्य सादरीकरणाचे अर्थात अरंगेत्रमचे आयोजन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी करण्यात आले. तिला शुभेच्छा देण्यासाठी रसिकांनी यावेळी गर्दी केली. गणेशवंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर अंजलीने अलारिपु सादर करून गुरू आणि पालकांसह रसिकांचा आशीर्वाद घेतला. यानंतर राम भजन, साधना आणि कौशल्य सांगणारे तसेच आणि नृत आणि नृत्य असणारे वर्णम् सादर केले. त्यानंतर नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवी महिमा सादर करताना तिने देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविले. भगवान कृष्णदर्शनाचे जावळी आणि महादेवाची कथा असणारे कीर्तनम् तर गतिमानतेचा आणि ताल-लयाचा खेळ असलेले तिल्लाना सादर करून नृत्याचा समारोप केला. कलात्मकता आणि अचूक सम पकडण्याचे अंजलीचे कौशल्य उल्लेखनीय होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. दर्डा म्हणाले, नागपूरची कन्या असलेल्या अंजलीचा मला अभिमान वाटतो. ज्येष्ठ नृत्यांगना वैजयंतीमाला, हेमामालिनी, शालू जिंदल यांच्यापेक्षा तिचे नृत्य कुठेही कमी वाटले नाही. तिने भविष्यात नागपूरचे नाव कलाक्षेत्रात उंच करण्यासाठी नागपूरकरांच्यावतीने माझ्या शुभेच्छा आहे. तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल माता-पिता धनलक्ष्मी व विवेक घोडवैद्य यांचेही अभिनंदन आहे, असे ते म्हणाले. यावेळी अंजलीला साथसंगत करणाऱ्या नृत्यगुरु रत्नम जनार्दनम्, गायक शिवप्रसाद एन.एन., सतीश कृष्णमूर्ती-मृदंगम, पूजा गिरवाडे-नटवंगम्, एस. कुमार बाबू-बासरीवादक, शिरीश भालेराव-व्हायोलिन, जानकीरमण अय्यर-वेशभूषा, , मिथून मित्रा-प्रकाशयोजना यांचाही सन्मान करण्यात आला. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रख्यात व्यावसायिक दिलीप छाजेड, दंदे फाऊंडेशनचे संचालक डॉ. पिनाक दंदे, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोहक पदलालित्याने रंगलेले भावपूर्ण नृत्य
By admin | Updated: October 11, 2015 03:10 IST