नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षांपासून रखडलेले मेडिकल कॉलेज येत्या सत्रांपासून सुरू होत आहे. या कॉलेजला पूर्णवेळ अधिष्ठाता (डीन) मिळावा म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अद्यापही त्यांना यश मिळाले नाही. या पदाला पात्र असलेल्या सुमारे चार प्राध्यपकांनी याला नकार दिल्याची माहिती आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयोसह महाराष्ट्रात सध्या १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालये सुरू आहेत. राज्य शासनाने विदर्भात गोंदिया, चंद्रपूरसह इतरत्र पाच नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे काम पूर्णत्वास आले असून मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) निकषाप्रमाणे पदभरती करणे सुरू आहे. यात खरी अडचण ठरत आहे ती अधिष्ठात्याचे पद. सध्या या कॉलेजचा भार नोडल अधिकारी म्हणून डॉ. प्रदीप दीक्षित यांच्यावर सोपविण्यात आला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या कॉलेजचे पूर्णवेळ अधिष्ठाता म्हणून डॉ. दीक्षित यांचे नाव त्यांची संमती न घेताच एमसीआयला पाठविण्यात आले होते. परंतु त्यांनी यावर आक्षेप घेऊन त्यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठ असलेल्यांचा विचार करावा, असे पत्रच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) पाठविले. याची दखल डीएमईआरने घेतली. अधिष्ठाता पदासाठी ज्येष्ठता यादीनुसार पात्र असलेल्या १० ते १२ प्राध्यापकांना या विषयी पत्राद्वारे विचारणा होत आहे. सोबतच या ज्येष्ठ प्राध्यापकांना ५५ वर्षाचे मेडिकल प्रमाणपत्र, तीन वर्षांचा ज्येष्ठता अहवालही मागितला आहे. परंतु पुण्याच्या मेडिकल कॉलेजसह इतर कॉलेजमधील चार-पाच पात्र उमेदवारांनी नकार दिला आहे. चंद्रपूरला पूर्णवेळ अधिष्ठाता मिळत नसल्याने डीएमईआर अडचणीत आले आहे. येत्या काही दिवसांत ते कठोर निर्णय घेईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
चंद्रपूर मेडिकलला मिळेना ‘डीन’
By admin | Updated: March 16, 2015 02:11 IST