मित्रांची धावाधाव : दिवसा २८५ - रात्री ४३० मद्यपींवर कारवाई नागपूर : मद्य प्राशन करून वाहन चालविण्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे ४३० तळीरामांचा थर्टीफर्स्ट विविध पोलीस ठाण्याच्या आवारात गेला. पोलीस ठाण्याच्या आवारात बसून सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याची या सर्वांवर वेळ आली. सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याची तयारी प्रत्येकजण आपापल्या कल्पनेनुसार करतो. कुणी पार्टीत बसून, तर कुणी डीजेच्या तालावर थिरकण्याची योजना आखतो तर, अनेकजण दोन-चार पेग लावून मस्तपैकी रस्त्याने फिरत नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असतो. यातील काही जण दारूच्या नशेत बेफाम वाहन चालवून अपघात घडविण्यास कारणीभूत ठरतात. अशा वाहनचालकांमुळे त्यांच्या स्वत:च्या जीवासोबत नाहकच दुसऱ्याच्याही जीवाला धोका निर्माण होतो. हे सर्व टाळण्यासाठी तसेच दारूच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री ‘ड्रंक न ड्राईव्ह‘ची मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा इशारा दिला होता. त्याला न जुमानता अनेक वाहनचालकांनी दारूच्या नशेत वाहने चालविली. त्यापैकी रात्री ९ ते पहाटे २ पर्यंत ४३० वाहनचालक पोलिसांच्या हाती लागले. या सर्वांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. याचसोबत ३१ डिसेंबरच्या दिवसभरात वाहतूक पोलिसांनी २८५ तळीरामांवर कारवाई केली. त्यामुळे दिवसरात्रीचा तळीरामांवरील कारवाईचा आकडा ७१५ वर पोहचला. (प्रतिनिधी)पोलीस ठाण्यात गर्दीच गर्दीदारुड्या वाहनचालकांवर शहरातील सर्वच भागात एकसारखी कारवाई होत असल्यामुळे २३ ही पोलीस ठाण्यात मद्यपी आणि वाहतूक पोलिसांची गर्दीच गर्दी दिसत होती. पोलिसांनी ठाण्यात नेलेल्या मद्यपींना तातडीने ठाण्यातून घरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे आप्तस्वकीय आणि मित्र धावपळ करीत असल्याचे दिसत होते. ‘अपना भी थर्टीफर्स्ट का मजा किरकिरा हो गया‘, असा त्रागाही काही जण व्यक्त करीत होते.
तळीरामांना चाप
By admin | Updated: January 2, 2015 00:55 IST