हायकोर्ट : राज्य शासनाला नोटीसनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांवरील केंद्र प्रमुख नियुक्तीप्रकरणी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांवरील केंद्र प्रमुखाच्या नियुक्त्या पदोन्नतीद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी शिक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करण्यात आली आहे. केंद्र प्रमुखपदासाठी बी. एड. पदवी आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार शिक्षकाने बी. एड. पदवी प्राप्त केली त्या तारखेपासून ज्येष्ठता मोजली गेली पाहिजे. परंतु, जिल्हा परिषदेने सेवाज्येष्ठतेचा नियम वापरला आहे. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. उशीरा बी. एड. पदवी मिळविणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याविरुद्ध दीपक उमक, नरेश बैसवार, प्रवीण मेश्राम, बंडू पोटे व अंकुश कडू यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. बी. एड. पदवी असेल तरच शिक्षक केंद्र प्रमुखपदासाठी पात्र ठरतो. यामुळे बी. एड. पदवी प्राप्त झाली ती तारीख महत्त्वाची आहे. त्या तारखेपासून ज्येष्ठता यादी तयार करावी, अशी याचिकाकर्त्यांची विनंती आहे. न्यायालयाने याचिकेवरील सुनावणीनंतर वरील अंतरिम निर्देश देऊन राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण संचालक व जिल्हा परिषदेला नोटीस बजावली. याप्रकरणावर २ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
केंद्र प्रमुख नियुक्तीवर जैसे थे आदेश
By admin | Updated: September 1, 2014 01:11 IST