जनमंचचा पुढाकार : विकासाला विरोध नाही; पण उत्तम दर्जाचा व्हावानागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. विविध विकास प्रकल्पांसोबतच शहराच्या सर्व भागात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु शहरातील नागरिकांनी सिमेंट रोडच्या कामासंदर्भात जनमंचकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केलेल्या आहेत. यात बांधकाम क्षेत्रातील अनेक तज्ज्ज्ञांचाही समावेश आहे. जनतेच्या पैशाचा सदुपयोग व्हावा, उत्तम दर्जाचे सिमेंट रस्ते व्हावे, या सामाजिक हेतूने सिंचन शोधयात्रेच्या धर्तीवर सिमेंट रोडचे ‘पब्लिक आॅडिट’ करण्याचा निर्णय जनमंचने घेतला आहे. रखडलेले सिमेंट रोड व उत्तम दर्जाचे काम होत नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत जनमंचने सिमेंट रोडचे पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जनमंचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी दिली. डांबरी रस्त्यांचे आयुष्य सिमेंट रोडच्या तुलनेत कमी असते. तसेच डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. सिमेंट रोडचा खर्च अधिक असला तरी आयुष्य अधिक असल्याने सिमेंट रोड व्हायलाच पाहिजे. परंतु ते उत्तम दर्जाचे व्हायला हवे. यात गैरप्रकार होत असल्यास तो रोखला पाहिजे. यासाठी तज्ज्ञांसमवेत जनमंचचे प्रतिनिधी शहरातील सिमेंट रोडची पाहणी करून पब्लिक आॅडिट करणार आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामात झालेला गैरप्रकार उघडकीस यावा. तसेच या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. यासाठी जनमंचच्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांसह राज्यभरातील सिंचन प्रकल्पांना भेटी दिल्या. या कामातील गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न के ला होता. त्याचधर्तीवर शहरातील सिमेंट रोडच्या कामांची पाहणी के ली जाणार आहे. या कामात गैरप्रकार आढळल्यास याला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नागपूर शहरात तीन टप्प्यात ६१९ कोटींची १३२ सिमेंट रोडची कामे केली जात आहे. पहिल्या टप्प्यात १०४ कोटींची क ामे हाती घेण्यात आली. यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यात २८० कोटींची कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)
चांगल्या कामाचे कौतुक करूसिमेंट रोडची कामे निकषानुसार होत नसल्यास अशा गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम जनमंच करणार आहे. परंतु सिमेंट रोडची कामे उत्तम दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आल्यास जनमंचकडून या कामाचे कौतुकही केले जाईल, अशी माहिती अनिल किलोर यांनी दिली.