लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : मालवाहू व प्रवाशी वाहनांच्या टॅंकमधील डिझेल चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढत असतानाच, देवलापार (ता.रामटेक) पाेलिसांनी पाठलाग करून डिझेल चाेरट्यांची स्काॅर्पिओ व डिझेल जप्त केले. चाेरटे वाहन साेडून पळून केल्याने पाेलीस त्यांचा शाेध घेत आहे. या कारवाईमध्ये एकूण ४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. ही कारवाई बुधवारी (दि. ११) मध्यरात्री करण्यात आली.
डिझेल चाेरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी देवलापार पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील चार माेठ्या टाेल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात त्यांना एमपी-१३/सीए-२२२२ क्रमांकाच्या स्काॅर्पिओवर संशय आला. पाेलिसांचे पथक बुधवारी (दि. ११) रात्री गस्तीवर असताना, त्यांना या क्रमांकाची स्काॅर्पिओ मनसर (ता.रामटेक) येथील चाैकात आढळून आली. ती नागपूरच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच, या पथकाने मनसरपासून त्या स्काॅर्पिओचा पाठलाग करायला सुरुवात केली. स्काॅर्पिओतील चाेरट्यांना पाेलीस पाठलाग करीत असल्याचेही लक्षात आले हाेते.
परिणामी, देवलापार पाेलिसांनी बेलतराेडी पाेलिसांना सूचना देत, नाकाबंदी करण्याची सूचना केली. बेलतराेडी पाेलिसांना केलेली नाकाबंदी पाहताच, स्काॅर्पिओ चालकाने आधीच स्काॅर्पिओ थांबविली व ती साेडून चालकासह इतरांनी अंधाराचा फायदा घेत, जंगलाच्या दिशेने पळ काढला. देवलापार पाेलिसांनी त्या स्काॅर्पिओची झडती घेतली असता, त्यांना आत प्रत्येकी ४० लीटर क्षमतेच्या प्लास्टीकच्या २१ कॅन, डिझेल टॅंकचे लाॅक ताेडण्यासाठी वापरले जाणारे पान्हे, प्लास्टीक पाइप आढळून आले. त्या कॅनचा वावर डिझेल भरण्यासाठी केला जात असल्याचे, तसेच त्या स्काॅर्पिओचा क्रमांक बनावटी असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले.
या कारवाईमध्ये चार लाख रुपयांची स्काॅर्पिओ व १० हजार रुपयांचे डिझेल व इतर साहित्य असा एकूण ४ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, रमेश खरकटे, गजानन जाधव यांच्या पथकाने केली असून, या घटनेचा पुढील तपास केशव पुंजरवाड करीत आहेत.
...
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वडंबा (ता.रामटेक) शिवारातील पेट्राेल पंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या टॅंकमधून डिझेल चाेरून नेण्यात आल्याची घटना २९ जूनच्या रात्री घडली हाेती. या टाेळीने दाेन ट्रकच्या टॅंकमधील एकूण ३०० लीटर डिझेल चाेरून नेले हाेते. त्यामुळे देवलापार पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली हाेती. त्यासाठी पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या खवासा (मध्य प्रदेश), खुमारी (ता.रामटेक), कन्हान (ता.पारशिवनी), बुटीबाेरी (ता.नागपूर ग्रामीण) येथील टाेल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली हाेती.