लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाेलिसांनी बिना संगम परिसरातील बिना जाेड येथे केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात आराेपी पळून गेल्याने तूर्तास कुणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र, वाहन व रेती असा एकूण २ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक मंगळवारी (दि. २७) मध्यरात्री गस्तीवर हाेते. त्यांना बिना संगम (ता. कामठी) परिसरातील बिना जाेड येथे अंधारात एमएच-४०/एके-७७४० क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन येताना दिसले. त्यांनी त्या वाहनाच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकने काही दूर अंतरावर वाहन थांबविले आणि ते साेडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
पाेलिसांनी त्या वाहनाची झडती घेतली असता, त्यात रेती आढळून आली. ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनासह रेती ताब्यात घेतली. या कारवाईमध्ये २ लाख ५० हजार रुपयाचे वाहन आणि तीन हजार रुपयाची एक ब्रास रेती असा एकूण २ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ती रेती कन्हान नदीतील असल्याचेही पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी वाहन चालकाविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार उमेश ठाकरे करीत आहेत.