लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेता पाेलिसांनी दारूची अवैध वाहतूक व विक्री यावर लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी (दि. १५) मतदान हाेणार असून, भिवापूर पाेलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुरुवारी (दि. १४) दुपारी ३ वाजताच्या सुमारास धामणगाव (विद्यामंदिर) येथे कारवाई करीत दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक केली. त्याच्याकडून दाेन दुचाकी व दारूच्या बाटल्या असा एकूण ५३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात तिघे पळून गेल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
मनीष सुभाष वाकडे (२४, रा. पारडपार, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, पळून गेलेल्या तिन्ही आराेपींची नावे कळू शकली नाही. चाैघेही एमएच-३४/एव्ही-६२३४ व एमएच-४०/ एच-८३७६ क्रमांकाच्या माेटरसायकलींनी धामणगाव (विद्यामंदिर) मार्गे दारू घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात घेऊन जात हाेते. ही बाब लक्षात येताच धामणगाव (विद्यामंदिर) येथील काही ग्रामस्थांनी त्यांना अडविले. या धावपळीत तिघांनी दुचाकी व दारूच्या बाटल्या साेडून पळ काढला. यातील एकाला नागरिकांनी पकडून ठेवले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून आराेपीस ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीच्या दाेन दुचाकी आणि १३ हजार ९०० रुपये किमतीच्या देशीदारूच्या पाच पेट्या असा एकूण ५३ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास प्रकाश चंगाेले करीत आहेत.