लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल/जलालखेडा/हिंगणा/रामटेक/कुही/नरखेड : ग्रामीण भागातही काेराेनाचे संक्रमण हळूहळू वाढत आहे. ते नियंत्रणात आणण्यासाठी आराेग्य विभागासह स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जनजागृती करायला सुरुवात केली आहे. साेमवारी (दि. २२) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये काटाेल तालुक्यात काेराेनाचे ३२, जलालखेडा (ता. नरखेड) येथे १३, हिंगणा तालुक्यात नऊ, रामटेकमध्ये पाच, तर कुही तालुक्यात दाेन नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे.
काटाेल तालुक्यातील काेराेना रुग्णांची संख्या साेमवारी अचानक ३२ वर पाेहाेचली. तालुक्यात राेज १०० पेक्षा अधिक नागरिकांची टेस्ट केली जाते. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये काटाेल शहरातील आययुडीपी व धंतोली येथील प्रत्येकी चार, पंचवटी व पेठबुधवार येथील प्रत्येकी तीन, तारबाजार व रामदेव बाबा लेआऊट येथील प्रत्येकी दोन तर खोमे ले-आऊट, बसस्थानक परिसर, दोडकीपुरा, सरस्वतीनगर, हत्तीखाना व लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील कोंढाळी येथे तीन, घरतवाडा व रिधोरा येथे प्रत्येकी दोन, तर मसली येथील एक रुग्ण आढळून आला.
जलालखेडा परिसरात १३ नवीन रुग्ण आढळून आले. यात नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे नऊ, जामगाव (बु.) येथे दाेन, तर मदना व राेहणा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. यात जलालखेडा येथील एकाच कुटुंबातील दाेघांचा समावेश आहे. हिंगणा तालुक्यात साेमवारी नऊ रुग्णांची नाेंद करण्यात आली. या नवीन रुग्णांमध्ये वानाडोंगरी येथील चार, टाकळघाट येथील तीन, मोंढा व डिगडोह प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आजवर एकूण ४,०७४ रुग्ण आढळून आले असून, यातील ३,९९२ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. शिवाय, १०० रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पाेलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात केली आहे.
रामटेक तालुक्यात साेमवारी पाच रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात रामटेक शहरातील गांधी वाॅर्ड व अंबाळा वाॅर्डातील प्रत्येकी एक, तर तालुक्यातील मनसर येथील दाेन आणि शिवनी येथील एक रुग्ण आहे. या पाच रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १,०६७ झाली असून, यातील ९४८ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, ४५ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. कुही तालुक्यातील दाेन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दाेन्ही रुग्ण वेलतूर परिसरातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या ६२३ झाली आहे.
..........
एकाचा मृत्यू
काेराेना संक्रमित रुग्णाचा साेमवारी मृत्यू झाला. हा रुग्ण जलालखेडा येथील रहिवासी असून, ताे काेराेनाचा या भागातील पहिला बळी ठरला. त्याची रविवारी (दि. २१) टेस्ट करण्यात आली हाेती. सायंकाळी त्रास वाढल्याने त्याला नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले हाेते. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने प्राथमिक आराेग्य केंद्राच्या मदतीने संपूर्ण गावाच्या निर्जंतुकीकरणाला सुरुवात केली असून, नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रशासनाने मेंढला परिसरातील गावांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली आहे.