उमेदवारांना दिलासा : निवडणुकीवर १० लाख खर्च करता येणार नागपूर : निवडणूक आयोगाच्या ३० जुलै २०११ च्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांतील उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार नागपूर महापालिका निवडणुकीत उमेदवारांना ४ लाखांपर्यत खर्चाची मर्यादा होती. परंतु इतक्या कमी खर्चात निवडणुकीचा खर्च करणे शक्य नव्हते. यामुळे उमेदवारात चिंतेचे वातावरण होते. परंतु राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा १० लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांत खुशीचे वातावरण आहे. गेल्यावेळी महापालिका निवडणुका दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ४ लाख निश्चित करण्यात आली होती. परंतु यावेळी चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होत आहे. प्रभागाचे क्षेत्रफळ वाढल्याने मतदारांची संख्याही वाढलेली आहे. अशा परिस्थितीत ४ लाखांत निवडणूक लढणे शक्य नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली होती. ज्या महापालिकेतील सदस्य संख्या १५१ वा त्याहून अधिक आहे, अशा महापालिकांतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा १० लाखांर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी घेतला आहे. यात नागपूर महापालिकेचा समावेश असल्याने या निर्णयाचे उमेदवारांनी स्वागत केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच काही इच्छूक उमेदवारांना लाखो रुपये खर्च करावे लागले. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर ४ लाखांत कसे भागणार असा प्रश्न बहुसंख्य उमेदवारांना पडला होता. अखेर राज्य निवडणूक आयुक्तांनीच यावर निर्णय घेतल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)
खर्चमर्यादा वाढल्याने उमेदवार ‘खूश’
By admin | Updated: February 2, 2017 02:36 IST