अजय पाटील : राष्ट्रवादी आॅटोरिक्षा संघटनेचे धरणेनागपूर : आॅटोरिक्षा परवान्याच्या लॉटरी पद्धतीच्या फेरवाटपातील मराठीची अट रद्द करा व नव्या अध्यादेशानुसार वाहन परवाना शुल्कात केलेली वाढ मागे घ्या, या मागणीसाठी राष्ट्रवादी आॅटोरिक्षा संघटनेतर्फे सोमवारी संविधान चौकात अजय पाटील यांच्या नेतृत्वात धरणे-आंदोलन करण्यात आले.पाटील म्हणाले, पूर्वी मध्य प्रदेशची ही राजधानी होती. त्यामुळे येथे हिंदीभाषिक लोकांची संख्या मोठी आहे. येथील अनेक मराठी लोकही हिंदी भाषेचा प्रयोग करतात. सरकारने ही बाब लक्षात घ्यावी. यामुळे मराठी भाषेची सक्ती रद्द करावी. यासोबतच महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा करून शासनाने काढलेला नवा अध्यादेश आॅटोचालकांचे कंबरडे मोडणारे आहे. नव्या अध्यादेशानुसार परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ करण्यात आली आहे. ही वाढ आॅटोचालकांवर अन्यायकारक आहे. हा अध्यादेशच मागे घ्यावा, अशीही मागणी केली. धरणे-आंदोलनानंतर पाटील यांच्या नेतृत्वात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे नेते दाऊद शेख, नगरसेविका प्रगती पाटील, राष्ट्रवादीचे शहर सचिव जावेद खान, जुग्रू पटेल, बाबूभाई, फुरुखन, रशिदभाई, अयुब बाबा यांच्यासह मोठ्या संख्येत आॅटोचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आॅटोचालकांसाठी मराठी भाषेची अट रद्द करा
By admin | Updated: March 1, 2016 03:06 IST