नागपूर : बेलतराेडी राेडवरील पद्मावतीनगर येथील रहिवासी सध्या विषारी सापाच्या दहशतीत आहेत. हे साप साधे विषारी नाहीत तर काेब्रा (नाग) आणि जगातील सर्वाधिक विषारी मानल्या जाणाऱ्या रसेल वायपरसारखे जीवघेणे साप आहेत. कधी नळ लाईन, कधी गडरलाईन तर कधी किचनच्या ओट्यावरही दिसून येतात. त्यामुळे रात्रीच नाही तर दिवसही नागरिकांना भीतीत काढावा लागताे.
परिसरातील डाॅ. देवतळे, भास्कर राऊत व इतर नागरिकांनी याबाबत लाेकमतशी बाेलताना भीती व्यक्त केली आहे. काही दिवसापूर्वीच राऊत यांच्या घरी किचन ओट्यावर वायपर चढला हाेता. त्यांच्या शेजारीच एका घरी समाेर असलेल्या नळाजवळ नागाचे दर्शन घडले हाेते. अशाप्रकारे कधी गेटवर तर कधी घरात या सापांचे दर्शन हाेत असते. डाॅ. देवतळे यांनी सांगितले, खाली जागेवर माती उकरली किंवा दगड जरी उचलला तरी रसेलची पाच-दहा पिल्ले सहज दिसून येतात. रात्री या परिसरात फिरणे जवळजवळ अशक्यच आहे. पण दिवसाही पाहुनच पाय ठेवावा लागताे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
रिकाम्या भूखंडामुळे अधिकच त्रास
परिसरात अनेक रिकामे भूखंड आहेत आणि या भूखंडावर कचरा साचला आहे. या कचऱ्यातूनही साप निघत असतात. भूखंड मालक महिनाेन्महिने फिरूनही पाहत नाही किंवा स्वच्छ करीत नाही. त्यामुळे भीतीपाेटी शेजारील नागरिकांना स्वत: खर्च करून कचरा साफ करावा लागताे. लाेकांनी अनेकदा तक्रारी दिल्या आहेत. हा परिसर ग्रामपंचायतमध्ये येताे. त्यामुळे भूखंडधारकांवर कारवाई केली जात नाही.
आनंद मेळ्याने वाढविली डाेकेदुखी
पद्मावतीनगरात मनाेरंजनासाठी आनंद मेळा लावण्यात आला आहे. यासाठी वस्तीच्या बाजूला असलेल्या शेतीची जागा उकरण्यात आली. जागा उकरल्याने जमिनीतील साप बाहेर निघून वस्तीत शिरत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे लाेकांची आणखीच डाेकेदुखी वाढली आहे. नागरिकांनी विराेध केला पण ठेकेदाराने लक्ष दिले नाही. ग्रामपंचायत सदस्यांनीही दुर्लक्ष केल्याचे लाेकांचे म्हणणे आहे. काेराेना काळात अशा गर्दीच्या आयाेजनाला जिल्हा कार्यालयाने परवानगी कशी दिली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
दर महिन्याला साप निघाल्याचे काॅल
सर्पमित्र शुभम यांनी सांगितले की, मनीषनगर ते बेलतराेडी व बेसा परिसर आधी जंगलाचाच भाग हाेता. खडकाळ जमीन व भुसभुसीत माती असल्याने हा परिसर नाग व रसेल वायपरसारख्या सापांसाठी अनुकूल अधिवास राहिला आहे. आता अनेक वस्त्या वसल्या. मात्र दर महिन्याला या भागातून हे विषारी साप निघाल्याचे पाच-सहा तरी काॅल येत असल्याचे शुभम यांनी सांगितले.