नागपूर : कोरोना लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कोरोना महामारीच्या लढाईत राज्यातील संपूर्ण व्यापारी सहकार्य करीत आहे. दुसरीकडे कोरोनाशी लढताना व्यवसाय वाचविणेही आवश्यक आहे. कठोर नियमांतर्गत बाजार सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. त्यात अग्रवाल म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. नागपूरचा संपूर्ण व्यवसाय ६ एप्रिलपासून बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. दिवसरात्र व्यस्त राहणारे व्यापारी सव्वा महिन्यापासून कामाविना बसले आहेत. अनेकांची मानसिक स्थिती खराब झाली आहे. रोजगार नसल्याने कर्मचारी आणि मजुरांची स्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाशी लढताना सरकारने व्यापाऱ्यांच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यापार बंद असल्यानंतरही व्यापारी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देत आहेत. वीजबिल, बँकेचे व्याज, मासिक हप्त्याचा नियमित भरणा करीत आहेत. गेल्या वर्षीही ५ महिने व्यवसाय बंद होता. सध्या व्यापाऱ्यांना अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासोबतच व्यवसाय वाचविणे गरजेचे आहे. व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट आले आहे.
१६ मेपासून सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कठोर नियमांतर्गत व्यवसाय करण्याची व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी. अनेकांनी व्हॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. कोरोना नियमांचे पालन करताना राज्यात आणि राज्याबाहेर जाण्याची परवानगी देण्याची विनंती अग्रवाल यांनी निवेदनातून केली आहे.