चौघे निलंबित : वाहन परीक्षकांकडून होत नाही तपासणीनागपूर : ‘ओव्हर हीट’मुळे जळालेल्या बसचा ठपका चार कर्मचाऱ्यांवर ठेवून एसटी महामंडळाने त्यांना निलंबित केले आहे. परंतु यात त्या कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नसून चंद्रपूरवरून आल्यानंतर ही गाडी इमामवाडा आगारात जमा केली असती तर अप्रिय घटना टळली असती, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.मोरभवन बसस्थानकात चंद्रपूरवरून आलेली बस जळून खाक झाली होती. या प्रकरणात इमामवाडा आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक आर. बी. नाकाडे, वीजतंत्री बैस, थापे, प्रमुख कारागीर गड्डम यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु ‘ओव्हर हीट’मुळे जळालेल्या या बसचा ठपका विनाकारण कर्मचाऱ्यांवर ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली. सूत्रांनुसार कोणतीही बस आपली फेरी आटोपून आल्यानंतर वाहन परीक्षकांकडून तपासल्या जाणे गरजेचे असते. परंतु इमामवाडा आगाराच्या बसेस मोरभवनात बेवारस उभ्या राहतात. नियमानुसार या बसेस आगारात आणून त्यांनी वाहन परीक्षकांकडून तपासणी होणे गरजेचे असते. त्यानंतरच ही बस पुढील फेरीसाठी उपलब्ध करून देण्यात येते. परंतु मोरभवनातच बसेस उभ्या राहत असल्यामुळे आणि त्यांची वाहन परीक्षकांकडून तपासणी होत नसल्यामुळे भविष्यात काळजी न घेतल्यास अशा प्रकारची घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा काहीच दोष नसून याबाबत यंत्र अभियंत्यांची भेट घेणार असल्याची माहिती एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव सुभाष वंजारी यांनी दिली. इमामवाडा आगाराच्या आगार व्यवस्थापक ज्योती उईके यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)
‘ओव्हर हीट’मुळे जळालेल्या बसचा ठपका कर्मचाऱ्यांवर
By admin | Updated: June 4, 2015 02:39 IST