नागपूर : कामठी राेडवर गुरुद्वाराजवळ असलेला रेल्वे अंडरब्रिज (आरयूबी) गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे. आतापर्यंत बांधकाम पूर्ण हाेऊ शकले नाही. या पुलाखाली लागलेली गर्डरच्या प्लेटला गंज चढला असून, ती खराब झाली आहे. या अतिशय वजनदार प्लेट्स ट्रॅकवर ठेवलेल्या गिट्टीच्या भाराने वाकायला लागली आहे. पुलाखाली केवळ एक व्यक्ती जाऊ शकेल एवढीच जागा सुटलेली आहे. येथूनच पायी जाणारे नागरिक, लहान मुले ये-जा करीत असतात. लाेखंडाच्या गंज चढलेल्या प्लेट्स पाहून त्या कधीही ढासळतील आणि एखादा अपघात हाेईल, अशी शक्यता दिसून येते. याबाबत मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ वाणिज्य प्रबंधक विपुल सुसकर यांना विचारले असता, तांत्रिक अडचणी आणि काेराेनाच्या कारणामुळे बांधकाम पूर्ण करण्यास उशीर झाला असल्याचे सांगितले. मात्र येत्या १५ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरापासून या कामामुळे रेल्वेची वाहतूकही कमी करण्यात आली आहे. रेल्वेकडे त्यांची स्वत:ची अभियांत्रिकी शाखा असताना, ते वेळेवर काम पूर्ण करू शकले नाही. हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र बऱ्याच काळापासून बंद असल्याने वाहनचालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.