सत्र न्यायालय : चारित्र्यावर संशय घेऊन केली क्रूरतानागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा छळ करून जाळून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लीलाधर काशीनाथ गजभिये (४३) असे आरोपीचे नाव असून, तो पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंभाड येथील रहिवासी आहे. सुरेखा लीलाधर गजभिये (४०), असे जखमी महिलेचे नाव आहे.प्रकरण असे की, ३ फेब्रुवारी २०१५ रोजी लीलाधर याने सुरेखाच्या चारित्र्यावर संशय घेऊन जबरदस्त मारहाण केली होती. याशिवाय तिच्या अंगावर रॉकेल ओतले होते. आगकाडी उगाळून तिच्या अंगावर फेकली होती. त्यामुळे ती गंभीररीत्या जळाली होती. याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी भादंविच्या ४९८ अ आणि ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलीस निरीक्षक डी.जी. मसराम यांनी तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ४९८-अ कलमांतर्गत साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंड तसेच भादंविच्या ३०७ कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राम अनवाणे, आरोपीच्या वतीने अॅड. अर्चना रामटेके यांनी काम पाहिले. सहायक फौजदार अरुण भुरे आणि हेड कॉन्स्टेबल प्रदीप बोरकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
पत्नीला जाळले; पतीस कारावास
By admin | Updated: May 18, 2016 03:18 IST