हिंगणा : आगीत साडेसहा एकरातील ऊस जळाल्याची घटना हिंगणा तालुक्यातील गुमगाव शिवारात शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या आगीत शेतातील अंदाजे ३५० टन ऊस जळाल्याची महिती शेतकऱ्याने दिली. रमाकांम मेंढे रा. गुमगाव, ता. हिंगणा यांची गुमगाव शिवारात शेती आहे. त्यांनी त्यांच्या तीन शेतांमध्ये एकूण १५ एकरात उसाची लागवड केली आहे. आपण गेल्या आठ वर्षांपासनू उसाची लागवड करीत असून, तो ऊस पूर्ती सहकारी साखर कारखान्याला विकत असल्याची माहिती रमाकांत मेंढे यांनी दिली. दरम्यान, शनिवारी सायंकाळी शेतातील उसाने पेट घेतला. त्यात अंदाजे ३५० टन ऊस जळाला.सदर घटनेची माहिती आपल्याला गणेश आष्टनकर याने भ्रमणध्वनीवर दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण बाहेरगावी असल्याने सदर आगीची माहिती आपण पुतण्याला दिली. त्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऊस वाळलेला असल्याने तो अल्पावधीतच खाक झाल्याचे त्यांनी सांगितले.या संदर्भात मेंढे यांनी सांगितले की, या शेतातील ऊस कापणीचा पूर्ती सहकारी साखर कारखान्यासोबत करार करण्यात आला होता. करारानुसार हा ऊस २० फेब्रुवारीपर्यंत कापावयाचा होता. ऊस कापणीसाठी आपण कारखाना प्रशासनाला वारंवार विनंती केली मात्र, योग्यवेळी ऊस कापण्यात आला नाही. त्यातच आगीत ऊस खाक झाल्याचे रमाकांत मेंढे यांनी सांगितले. पूर्ती सहकारी साखर कारखान्याचे गुमगाव गटप्रमुख उरकुडे यांनी सांगितले की, मेंढे यांच्या शेतातील ऊस कापण्यासाठी आपण यापूर्वी दोनदा मजूर आणि मशीन पाठविली होती. मात्र, त्यांनी ऊस कापणीस नकार दिल्याने ऊस कापणे शक्य झाले नाही. या आगीत मेंढे यांचे नुकसान झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
साडेसहा एकरातील ऊस जळाला
By admin | Updated: April 26, 2015 02:19 IST