रोख आणि दागिने लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती नगरात राहणारे दर्शन अरविंद सूर्यवंशी यांच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख आणि सोन्याचे दागिने लंपास केले. रविवारी मध्यरात्री ही घटना उघडकीस आली. दर्शन सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २३ नोव्हेंबरला दुपारी ते सहपरिवार बाहेरगावी गेले होते. रविवारी रात्री ११ वाजता परत आले. तेव्हा त्यांना त्यांच्या दाराचा कडीकोंडा तुटून दिसला. आत पाहणी केली असता चोरट्यांनी कपाटातील रोख ५० हजार, तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.