कृषी विभागाची धडक मोहीम : जिल्ह्यातील ४९७ दुकानांची तपासणीनागपूर : कृषी विभागाच्या भरारी पथकाने जिल्ह्यातील दोन कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहे. मे. बागबान अॅग्रो एजन्सी, पचखेडी, ता. कुही व मे. धनजोडे कृषी सेवा केंद्र, कुही अशी त्या दोन दुकानांची नावे आहेत. विशेष म्हणजे, यासाठी नागपूर कृषी विभागाने कृषी सेवा केंद्र तपासणीची धडक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष भरारी पथके सज्ज करण्यात आली आहेत. या सर्व पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ४९७ कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या धडक मोहिमेत कृषी सेवा केंद्रावर दरफलक अद्ययावत लिहिलेला नसणे, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके या निविष्ठांच्या विक्रीकरिता परवानगी दिलेले प्रमाणपत्र नसणे,साठा रजिस्टर अद्ययावत लिहिलेले नसणे, निविष्ठा विक्री बिलांवर लॉट क्रमांक न लिहिणे, विक्रीकरिता ठेवलेला साठा व साठा पुरस्तकातील नोंदी न जुळणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या सर्व त्रुटींबाबत एकूण ८० कृषी सेवा केंद्रांना २३८ वेगवेगळे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीविरुद्ध बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यातून बियाण्यांसंबंधी प्राप्त होत असलेल्या तक्रारीवर संबंधित कंपनीच्या बियाण्यांचे नमुने गोळा केले जात आहेत. आतापर्यंत गुणनियंत्रण निरीक्षकांनी बियाण्यांचे २३९, रासायनिक खतांचे ३९ आणि कीटकनाशकाचे ५ नमुने काढून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. (प्रतिनिधी)
कृषी केंद्रांना दणका
By admin | Updated: July 12, 2016 03:02 IST