खळबळजनक खुलासा : गुन्हेशाखेने लावला छडा : सहा गजाआड, दोन फरार नागपूर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले अतुल पंढरीनाथ वैद्य (वय ४७) आणि त्यांची पत्नी वंदना (वय ४०) यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. जागेच्या वादातून घराजवळच्या एका बिल्डरने भाडोत्री गुंडाच्या हाताने वैद्य दाम्पत्याची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह शहरापासून ३० किलोमीटर दूर बुटीबोरीजवळ पुरले. गुन्हेशाखेने बुधवारी पहाटे या प्रकरणाचा उलगडा केल्यानंतर वैद्य दाम्पत्याचे जमिनीत पुरलेले मृतदेह बाहेर काढले. सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती देताना या प्रकरणात मुख्य सूत्रधार बिल्डर किरण नामदेव महल्ले याच्यासह सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, दोघे फरार असल्याचेही सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (गुन्हे शाखा) रंजनकुमार शर्मा आणि परिमंडळ तीनचे उपायुक्त राजकुमार उपस्थित होते. बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पंढरीनाथ वैद्य यांची अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशीनगरात प्रशस्त जागा होती. यातील काही जागा वैद्य यांनी दान दिली होती. तर, तीन हजार चौरस फुटाच्या जागेवर पंढरीनाथ यांचा परिवार राहत होता.त्यांना तीन मुले आणि मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले असून मुलांपैकी एक अतुल, दुसऱ्या एकाचा मृत्यू झाला. तर पंढरीनाथ यांचा तिसरा एक मुलगा दिव्यांग आहे. असा लागला छडा अजनी पोलीस आणि गुन्हेशाखेचे पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते. दरम्यान, बिल्डर किरण महल्लेच्या संपर्कात कुख्यात बंटी बैसवारेसह अन्य काही नवे-जुने गुन्हेगार १२ आॅगस्टपासून असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यातील एकाला गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी संशयावरून ताब्यात घेतले. त्याने वैद्य दाम्पत्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. पोलिसांनी लगेच धावपळ करीत मुख्य आरोपी किरण नामदेव महल्ले (वय ३५, रा. काशीनगर, रामेश्वरी, नागपूर), महेश मोती बलहारिया (वय २७, रा. टोली नागपूर), बंटी ऊर्फ चंद्रशेखर अशोक बैसवारे (वय २५, रा. पारडी, कळमना), प्रणय प्रकाश नवनागे (वय ३०, रा. कांजी हाऊस चौक, कळमना) आणि लकी ऊर्फ लंकेश राजेंद्र जुगनाके (वय २८, बजेरिया) या सहा जणांना अटक केली. उपरोक्त आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैद्य दाम्पत्याचे मृतदेह ज्या ठिकाणी पुरले ते ठिकाण शोधण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची पथके रात्रभर बुटीबोरी परिसरात शोधाशोध करीत होती. पहाटे ते ठिकाण सापडले. त्यानंतर तालुका दंडाधिकाऱ्याच्या उपस्थितीत एसीपी राठोड, पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड, एपीआय प्रदीप अतुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुटीबोरी-उमरेड मार्गावरील पाथरी-थाना शिवारात जंगली भागात पुरलेले वैद्य दाम्पत्याचे मृतदेह उकरून बाहेर काढले. डीएनएच्या माध्यमातून मृत वैद्य दाम्पत्याची ओळख पटविली जाणार आहे. दरम्यान, आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचा १७ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. आधीच ठेवले खड्डे करून नागपूर : आरोपींनी वैद्य दाम्पत्याच्या हत्येचा कट आधीच रचला होता. त्यानुसार, १२ आॅगस्टच्या रात्री १० वाजता आरोपी वैद्य यांच्या घरात शिरले. यावेळी अतुल वैद्य घराबाहेर होते. एकट्या घरात असलेल्या वंदनाला त्यांनी शिवीगाळ आणि धमकावणे सुरू केले. वंदनानेही त्यांचा तीव्र प्रतिकार केला. यामुळे आरोपींनी त्यांचे तोंड दाबून त्यांना मारहाण सुरू केली. तेवढ्यातच अतुल वैद्य घरात पोहचले. आरोपी पत्नीला तोंड दाबून मारत असल्याचे पाहून त्यांनीही आरडाओरड केली. त्यामुळे आरोपींनी त्यांनाही घरात ओढले. दार बंद करून त्यांच्यावर खंजरचे सपासप घाव घालून त्यांना ठार मारले. त्यानंतर पती-पत्नीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून आरोपी निघून गेले. पहाटे ४ च्या सुमारास आरोपी परत आले. त्यांनी सफारीमध्ये मृतदेह ठेवले. घरातील पुरावे नष्ट केले आणि मृतदेह बुटीबोरीजवळच्या जंगलात नेऊन पुरले. या प्रकरणात फरार असलेले आणखी दोन आरोपी कोण, त्याचा खुलासा पोलिसांकडून होऊ शकला नाही. पंढरीनाथ यांच्या मृत्यूनंतर या जागेवर अतुल यांचे वास्तव्य होते. बिल्डर किरण महल्ले याने ही जागा विकत घेण्याचा सौदा वैद्य यांच्या काही नातेवाईकांसोबत केला होता. या सौद्याला विरोध करून अतुल आणि त्यांची पत्नी वंदना यांनी जागेवरचा ताबा सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे जागेच्या सौद्यावरून बिल्डर महल्ले आणि वैद्य दाम्पत्यातील वाद विकोपाला गेला होता. भांडणासोबतच पोलिसांकडे परस्परविरोधात तक्रारीही झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर १२ आॅगस्टपासून वैद्य दाम्पत्य रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले. त्यानंतर वैद्य यांचे नातेवाईक, निकटवर्तीय आणि बिल्डर महल्लेचे निकटवर्तीय यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची जुगलबंदी सुरू झाली. चार आठवडे होऊनही वैद्य दाम्पत्याचा कुठलाही पत्ता, ठिकाणा मिळत नसल्यामुळे त्यांचे हिंगणघाट (जि. वर्धा) येथील नातेवाईक गौतम नागोराव खडतकर यांनी अजनी पोलीस ठाण्यात २९ आॅगस्टला तक्रार नोंदवली. जागेचा वाद लक्षात घेता बिल्डर महल्लेने वैद्य दाम्पत्याचे अपहरण करून त्यांना बंदिस्त करून ठेवले असावे, असा संशयही व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणात २ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला. मात्र, बिल्डरची थातूरमातूर चौकशी करून प्रकरण थंडबस्त्यात टाकले. बिल्डरचे काही वजनदार आणि गुन्हेगार साथीदार यांनी संगनमत करून वैद्य दाम्पत्याची हत्या केली अणि पुरावे नष्ट केले असावे, असा संशयवजा आरोप तेव्हापासून लावला जात होता.
पोलिसांची टाळाटाळ सूत्रधार महल्ले याने काम दिल्यानंतर आरोपी महेश बलहारिया याने साथीदारांची जमवाजमव केली आणि १२ आॅगस्टच्या रात्री वैद्य दाम्पत्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह टाटा सफारीत टाकून माथनी परिसरात नेल्याचेही सहआयुक्तांनी सांगितले. मारेकऱ्यांना महल्लेकडून नेमकी किती रुपयांची सुपारी मिळाली होती, वेळ कोणती होती, ते स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. उपरोक्त आरोपींमध्ये सूत्रधार महल्लेसह अनेक जण गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले. त्यांनी या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा इन्कार केला. मृत वैद्य दाम्पत्याने यापूर्वी अनेकदा अजनी ठाण्यात तसेच वरिष्ठांकडे तक्रार केली होती. बिल्डर महल्लेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचेही तक्रारीत नमूद केले होते. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे महल्लेने वैद्य दाम्पत्याची हत्या करवून घेतली. पोलिसांची ही हलगर्जी नाही का, असा प्रश्न केला असता सहआयुक्तांनी त्याचा इन्कार केला. अनेक वेळा तक्रारच नोंदवून न घेणे, नंतर बेपत्ता दाम्पत्य किंवा आरोपी बिल्डरची गांभीर्याने चौकशी न करणे, घटनेच्या तब्बल तीन महिन्यानंतर दुहेरी हत्याकांडाचा उलगडा होणे, हे पोलिसांच्या नाकर्तेपणाचे लक्षण नाही काय, असा प्रश्न एका पत्रकाराने उपस्थित केला असता पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडल्यामुळेच हत्याकांडाचा उलगडा झाल्याचे सहआयुक्त म्हणाले. या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्नांची उतरे देण्याचे उपरोक्त अधिकाऱ्यांनी टाळले. पत्रपरिषदेला गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत आणि अजनीचे सहायक आयुक्त श्रावण राठोड, ठाणेदार सांदिपान पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)पोलीसपुत्र महल्ले चिटर, गुन्हेगारच !या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार किरण महल्ले पोलिसाचा मुलगा आहे. त्याचे वडील नामदेव महल्ले लोहमार्ग पोलिसात एएसआय होते. एका खासगी कंपनीला ९५ लाखांचा गंडा घातल्याच्या आरोपात किरणला गुन्हे शाखा (आर्थिक सेल) पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्याचा पीसीआरही घेतला होता. मात्र, कारागृहातून बाहेर पडल्यानंतरही त्याच्या वृत्तीत सुधारणा झाली नाही. जमिनीच्या अर्थात् पैशाच्या लोभात त्याने एका गरीब दाम्पत्याचा जीव घेतला. विशेष म्हणजे, यापूर्वी पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून मृताचे नातेवाईक तसेच काही निकटवर्तीयांनी या प्रकरणाची पोलीस आयुक्त, सहआयुक्तांकडे तक्रार केली होती. कोर्टातही याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने पोलिसांना प्रकरणाच्या संबंधाने शपथपत्र सादर करण्याचे आणि सहपोलीस आयुक्तांनी स्वत: हजर राहण्याचे आदेश दिले होते.
खुनातील आरोपींना १७ पर्यंत पोलीस कोठडीअजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशीनगर येथील वैद्य दाम्पत्याचे चार महिन्यापूर्वी अपहरण करून निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी सहाही आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. किरण नामदेवराव महाले (३५) रा. व्हिज्डम अपार्टमेंट काशीनगर, महेश मोती बलहारिया (२७) रा. लोहार सभागृह एकता सोसायटी, चंद्रशेखर ऊर्फ बंटी अशोक बैसवारे (२५) , पंकज भोलाराम तिवारी (२५) दोन्ही रा. शिवनगर पारडी, प्रणय प्रकाश नवनागे (३०) रा. इंदिरा मातानगर कळमना आणि लंकेश ऊर्फ लकी राजेंद्र जुनाके (२८) रा. बजेरिया, अशी आरोपींची नावे आहेत. अतुल पंढरीनाथ वैद्य (४५) आणि वंदना अतुल वैद्य (४०), असे मृत दाम्पत्याचे नाव होते. गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी या सर्व आरोपींना बुरख्यात न्यायालयात आणले. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर यांनी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले. २४ नोव्हेंबरपर्यंत आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करताना सहायक सरकारी वकील रत्ना घाटे यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींचा खून करण्यामागील निश्चित हेतू काय, खुनाची योजना कशी आखली याबाबत सखोल तपास करावयाचा आहे. आरोपींचे आणखी तीन साथीदार फरार असून त्यांचा ठावठिकाणा या आरोपींना माहीत आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि वाहन जप्त करणे आहे. बचाव पक्षाचे वकील अॅड. लुबेश मेश्राम, अॅड. श्रीनिवास ढोबळे यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.