राहुल लखपती
नागपूर : शहरातील एका बिल्डरने महापालिकेची परवानगी न घेता व्यावसायिक इमारतीच्या बांधकामासाठी १८७ झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. या प्रकरणी महापालिकेने संबंधित बिल्डरला नाेटीस बजावली असून वृक्षताेडी विराेधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
एनएचएआयद्वारे अजनी आयएमएस प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षताेडीविराेधात आधीच पर्यावरण प्रेमींचे आंदाेलन चालले असताना या बिल्डरकडून झालेल्या या वृक्षताेडीमुळे पर्यावरणवाद्यांमध्ये असंताेष पसरला आहे. उमरेड राेडवरील निर्मल उज्ज्वल क्रेडिट काे-ऑपरेटिव्ह साेसायटीद्वारे प्रायाेजित निर्मल नगरीच्या बिल्डरकडून ही वृक्षताेड झाली आहे. निर्मल नगरीला लागून असलेल्या भूमीवर माेठ्या प्रमाणात झाडांची संख्या हाेती. बाभूळ, सुबाभूळ, कडूनिंब, गुलमाेहर, बाेर आदी प्रजातीची दाट झाडे या परिसरात हाेती. पाेपट, माेर, काेकीळ अशा विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास येथे हाेता. निर्मलनगरीचेच रहिवासी सकाळ, सायंकाळ येथे फिरायला निघायचे. या दाट झाडांच्या हिरवळीमुळे परिसरातील वातावरण आल्हाददायक हाेते. मात्र व्यावसायिक लाभासाठी कशाचाही विचार न करता येथील झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेची परवानगी घेण्याची तसदीही बिल्डरने घेतली नाही.
याविराेधात महापालिकेच्या उद्यान विभागाने महाराष्ट्र वृक्षसंवर्धन व संरक्षण कायदा १९७५ नुसार संबंधित बिल्डरला नाेटीस बजावली आहे. याबाबत उद्यान विभागाचे पथक त्या जागेची तपासणी करायला गेले असता १८७ झाडे कापलेली दिसून आली. पथकाने झाडांचा पंचनामा करून बिल्डरला नाेटीस बजावत हे प्रकरण न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान निर्मल नगरीचे संचालक प्रमाेद मानमाेडे यांनी मनपाच्या आराेपांचे खंडन केले आहे. ही जागा निवासी गाळे इमारत बनविण्यासाठी घेतलेली असून महापालिकेनेच हा ले-आऊट मंजूर केला आहे. आम्ही घेतलेल्या ले-आऊटवरचीच झाडे कापली असून ही झाडे कुणीही लावली नव्हती. इमारत बांधकामासाठी ही जागा साफ करणे गरजेचे हाेते व तेच केले. बाभळीच्या झाडांना कापण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नव्हती आणि इतर झाडांना कापण्याच्या परवानगीसाठी आधीच महापालिकेकडे अर्ज दिला असून मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे मानमाेडे यांनी लाेकमतशी बाेलताना स्पष्ट केले.
बिल्डरकडून कापण्यात आलेली झाडे
झाडाचे नाव संख्या झाडांची उंची
बाभूळ ३५ ३० ते ३५ फूट
सुबाभूळ ७३ २५ ते ३० फूट
बाेर ७८ २२ ते २८ फूट
गुलमाेहर ०१ ३५ ते ४० फूट
एकूण १८७