आत्मनिर्भर भारतावर भर देताना कोरोना महामारीच्या संकटात अर्थसंकल्पात आरोग्यावर जास्त भर दिला आहे. टेक्सटाइल पार्क, रस्ते, रेल्वे आणि छोट्या कंपन्यांसाठी केलेली तरतूद तसेच करपात्र उत्पन्नासाठी वाद निराकरण समितीचे गठन ही पावले उत्तम आहेत. स्टार्टअपसाठी एक वर्ष करात दिलेली सूट या क्षेत्राला प्रोत्साहन देणारी आहे. सीमाशुल्क कमी केल्याने कच्च्या मालाच्या किमती कमी होतील.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असो.
प्रत्येक क्षेत्राला दिलासा
जुने मोटर वाहन स्क्रॅप धोरण, सात मेगा टेक्सटाइल पार्क, फ्रेट कॉरिडोर, वीजग्राहकांना एकापेक्षा जास्त वीज कंपनी निवडण्याचे धोरण, सिक्युरिटीज कायद्याचे एकत्रिकरण, कॉर्पोरेट कायद्याची सुलभ चौकट व्यवसाय अनुकूल व अनुपालन खर्च कमी करण्याचे स्वागतार्थ निर्णय आहेत. वरिष्ठ नागरिकांना करसवलत व नवीन कर न आकारल्याचा निर्णय योग्य आहे.
दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेड.
अर्थव्यवस्था वाढीचा अर्थसंकल्प
सरकारच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या आश्वासनानुसार वाढीसाठी अर्थसंकल्प आहे. उज्ज्वला योजनेच्या आणखी एक कोटी लाभार्थींच्या विस्ताराचे स्वागत आहे. छोट्या कंपन्यांचे पेडअप भांडवल ५० लाखांवरून दोन कोटी आणि जास्तीत जास्त उलाढाल २० कोटींपर्यंत वाढल्यास दोन लाख कंपन्यांना फायदा होईल. लाभांश वितरण कर रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. कर सवलतीने स्टार्टअपला चालन मिळेल.
नितीन खारा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कॉन्फिडेन्स ग्रुप
उज्ज्वल भविष्याचा संकल्प
सामायिक सुरक्षा, आरोग्य, पायाभूत सुविधा, पारदर्शक करप्रणाली, संशोधन क्षेत्र, विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प असलेला अर्थसंकल्प आहे. समाजातील सर्व वर्ग आणि क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून आणि आत्मनिर्भर भारताचा वाट मजबूत करण्याचा निर्धार अर्थसंकल्पात आहे. कोरोना महामारीतून विकासाची वाट सुकर करणारा आहे.
प्रा. संजय भेंडे, संचालक, नॅफकब
संमिश्र अर्थसंकल्प
यंदाचा अर्थसंकल्प संमिश्र आहे. एसएमई व आयकर स्लॅब कमी केलेले नाहीत. एमएसएमईसाठी काही विशेष नाही. स्वास्थ्य, कृषीवर लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनामुळे नवीन कर नाही. नागपूर मेट्रो टप्पा-२ आणि रस्ते विकासासाठी जास्त तरतूद योग्य आहे. त्यामुळे विदर्भाचा विकास होईल. कृषी सेसचा परिणाम काही दिवसांत दिसून येणार आहे. एखादा टेक्सटाइल पार्क विदर्भात आल्यास विकास होईल.
सुरेश राठी, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन