संविधान चौकात निदर्शने : निवडणुका पुन्हा बॅलेटने घेण्याची मागणी नागपूर : भाजप ‘ईव्हीएम’ मध्ये गडबड करून निवडणूक जिंकत आहे असा आरोप करीत बसपाने रविवारी दुपारी संविधान चौकात आंदोलन केले. यावेळी ‘ईव्हीएम’चे प्रतिकात्मक दहन करून ‘ईव्हीएम’ला विरोध दर्शविला. तसेच २०१७ मध्ये घेतलेल्या निवडणुका रद्द करून बॅलेटपेपरने त्या पुन्हा घेण्यात याव्यात, अशी मागणी केली. यावर्षी महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला, तेव्हापासून ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे आरोप केले जात आहेत. हे आरोप भाजप सोडला तर सर्वच पक्ष सातत्याने करीत आहेत. या अंतर्गत बसपातर्फे रविवारी दुपारी संविधान चौक येथे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम मशीनचे प्रतिकात्मक दहन करून आपला विरोध प्रकट करण्यात आला. यावेळी ‘ईव्हीएमम’ध्ये गडबड करता येऊ शकते, असे सांगत अमेरिकेत ईव्हीएम मशीन तयार झाल्या परंतु त्या देशातील नागरिकांनी ईव्हीएम मशीनला विरोध केला आणि पुन्हा तिथे बॅलेट पेपरने निवडणुका होत असल्याचा प्रकार आंदोलकांनी निदर्शनास आणून दिला. यावेळी बसपाचे अध्यक्ष नागोराव जयकर, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश महासचिव जितेंद्र म्हैसकर, विश्वास राऊत, डॉ. राजेंद्र पडोळे, पृथ्वीराज शेंडे, चंद्रशेखर कांबळे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसैन, रूपेश लोखंडे, संजय सोमकुंवर, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, मो. जमाल, पंजाब फुलझेले, आशिष सरोदे, नरेंद्र वालदे, अविनाश बडगे, महिपाल सांगोळे, संघपाल उपरे, संजय बुर्रेवार यांच्यासह बहुजन मुक्ती मोर्चा, काँग्रेस, बामसेफ, बहुजन व्हालेंटियर फोर्ससह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
बसपाने केले ईव्हीएमचे दहन
By admin | Updated: March 13, 2017 02:00 IST