नागपूर : एकेकाळी पायी चालण्यावर भर असायचा. मात्र काळ बदलला. कामाची घाई, धावपळ, वेळेची बचत यामुळे उठसूट बाईकवरून फिरणे सर्वमान्य झाले. या अनेक कारणांमुळे चालायची सवयच मोडली आहे. आरोग्यावर याचा उलट परिणाम होत असून ही सवय आजारांना निमंत्रण देत आहे.
अलीकडे घरोघरी दुचाकी आणि चारचाकी आहे. साधे चौकात भाजी किंवा दूध घ्यायला जायचे म्हटले तरी बाईकशिवाय भागत नाही. पायी जाणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. ज्येष्ठांचेच नाही तर तरुणांचेही बाईकशिवाय भागत नाही. जिना उतरणे आणि चढणे हा चांगला आणि सोपा व्यायाम असला तरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना हा प्रकार वारंवार करणे कष्टाचे होते. अलीकडे लिफ्टचा वापर अधिक वाढला आहे. दुकानात खरेदीसाठी जाण्याचेही अनेकजण टाळतात. दुकानदाराला ऑनलाईन यादी पाठविली की घरपोच किराणा, दूध, भाजीपाला पोहचतो. यासह अनेक कारणांमुळे पायी चालण्याची सवय मोडली आहे.
...
या कारणांसाठीच होतेय चालणे
ज्येष्ठ -व्यायाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ
महिला - किराणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत
पुरुष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली
तरुणाई -गल्लीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत
...
म्हणून वाढले हाडांचे आजार (डॉक्टरांचा कोट)
गुडघा दुखतो म्हणून पायी फिरणे बंद करू नका, उलट दुखणे कमी करण्यासाठी पायी फिरा. यामुळे गुडघ्याच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात. मोकळ्या वातावरणात चालल्याने फुफ्फुसाला अधिक प्राणवायू मिळतो. वजन वाढणे, कंबर, पाठदुखी, गुडघेदुखी, ऑस्टिओपोरोसिस व मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज ६ ते १० हजार पावले पायी फिरा.
- डॉ. अलंकार रामटेक, आर्थोपेडिक तज्ज्ञ
...
हे करून पाहा
- किमान एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा
- कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या
- घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा
...
ज्यांना पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...
पायी चालणे जमत नसणाऱ्यांनी शक्य असल्यास पोहण्याची आणि सायकलिंगची सवय लावावी. हा सर्वांगासाठी उत्तम व्यायाम आहे. मांडी घालून बसण्याची तसेच इंडियन टाॅयलेटची सवय असेल तर ती मोडू नका. लहान मुलांनासुद्धा पायी चालवा. त्यांना परिसराच्या ठळक खुणा लक्षात राहतात. ओळखी अधिक घट्ट होतात.
...