जलालखेडा : काटाेल-जलालखेडा-वरुड मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गावर नरखेड तालुक्यात जाम व वर्धा नदीवर माेठे पूल असून, त्यांचे बांधकाम अनुक्रमे ४५ व ६० वर्षांपूर्वी करण्यात आल्याने ते दाेन्ही पूल कालबाह्य झाले असल्याने त्यावरून हाेणारी जड वाहतूक धाेकादायक ठरत आहे. या नद्यांवरील पुलांचे बांधकाम तीन वर्षांपासून अर्धवट असल्याने ते कधी पूर्ण केले जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
हा मार्ग अमरावती, वर्धा तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला जाेडणारा असल्याने त्यावर सतत रहदारी असते. मध्यंतरी या मार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाला सुरुवात करण्यात आली. काटाेल ते वरुड दरम्यानच्या राेडचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्याचवेळी या दाेन्ही नद्यांवर पुलांचे बांधकाम करावयाचे हाेते. त्याअनुषंगाने दाेन्ही पुलांच्या बांधकामास तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली.
यात जाम नदीच्या पात्रात १२ ते १५ फूट तर वर्धा नदीच्या पात्रात २ ते ४ फूट उंचीचे काॅलम तयार करण्यात आले. त्यानंतर या पुलांचे काेणतेही काम करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, दाेन्ही पूल वळणावर असून, थाेडे सखल आहेत. त्यांचे सुरक्षा कठडेही तुटलेले आहेत. त्यामुळे येथे हाेणारे अपघात टाळण्यासाठी दाेन्ही पुलांचे वळण शक्यताे कमी करणे आणि ते राेडला समांतर करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे केले जात असलेले दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
---
४५ ते ६० वर्षांपूर्वीचे बांधकाम
जाम नदीवरील पुलाचे बांधकाम ४५ वर्षांपूर्वी अर्थात सन १९७५ मध्ये आणि वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६० साली करण्यात आले. या दाेन्ही नद्यांना दरवर्षी पूर येताे. सन १९९१ साली आलेल्या पुरामुळे भारसिंगी नजीकच्या जाम नदीवरील पुलासाेबतच जलालखेडा नजीकच्या वर्धा नदीवरील पुलाला तडे गेले हाेते. या पुलांचा काही भाग वाहूनही गेला हाेता. दरवेळी जुजबी दुरुस्ती करून काळ काढला जात आहे.