जावयावरही चाकूहल्ला : कोतवालीत प्रेमविवाहामुळे थरार नागपूर : मुलीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या वधूपित्याने लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच मुलीच्या दीराची हत्या केली. जावयालाही चाकूने मारले. सौरभ हेमंत गोईकर (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो परिसरात पानटपरी चालवित होता. त्याने नुकतीचा बारावीची परीक्षा दिली होती. कोतवालीत घडलेल्या या थरारक घटनेमुळे मंगळवारी दुपारपासून परिसरात तणावाचे वातावरण होते. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काशीबाई देवळाजवळ सौरभ हेमंत गोईकरचे घर आहे. आरोपी दशरथ बुधोजी चिंचोळे (वय ५५) त्याच वस्तीत राहतो. सौरभचा मोठा भाऊ शुभम हा महापालिकेत सफाई कर्मचारी आहे. शुभम आणि आरोपी दशरथ चिंचोळेची मोठी मुलगी रोशनी हिचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. चिंचोळेचा त्याला विरोध होता. वडिलाच्या विरोधाला झुगारून रोशनीने ३१ मार्चला घर सोडले आणि शुभमसोबत एका मंदिरात लग्न केले. हे कळाल्याने आरोपी दशरथ चिंचोळे कमालीचा संतापला. तो वारंवार रोशनी आणि शुभमला शोधण्यासाठी त्यांच्या घरी येऊ लागला. दरम्यान, सोमवारी दुपारी गोईकर परिवाराने शुभम आणि रोशनीच्या लग्नाच्या निमित्ताने पूजा आणि पाहुण्यांच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. रोशनीची आई आणि बहीण तेथे आले. त्यांना गोईकर परिवारातील सदस्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली. मात्र, या दोघींनी तेथे शिवीगाळ केल्याने तेथील मंडळींनी हुसकावून लावले. त्या घरी गेल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास आरोपी चिंचोळे तेथे आला. त्याने शुभम आणि रोशनी या दोघांना अश्लील शिवीगाळ सुरू केली. ते पाहून शुभम तसेच त्याचा भाऊ सौरभ आणि साहिल आरोपी दशरथ चिंचोळेची समजूत काढू लागले. मात्र, आरोपी ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्याने जावयावर हात उगारला. ते पाहून सौरभने आरोपीला बाजूला नेण्याचे प्रयत्न केले असता त्याने सौरभच्या पोटावर चाकूचे वार केले. जावई शुभम आणि त्याचा दुसरा भाऊ साहिल याच्यावरही चाकूहल्ला केला. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ निर्माण झाला. गोईकर परिवारातील सदस्य आणि पाहुण्यांनी आरोपीची बेदम धुलाई केली. त्यानंतर तो घरून पळून गेला. गंभीर जखमी झाल्याने सौरभला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची आई नेहा गोईकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला. दरम्यान, मंगळवारी सकाळी सौरभचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी चिंचोळेविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला त्याचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
वधूपित्याने केली मुलीच्या दीराची हत्या
By admin | Updated: April 5, 2017 02:03 IST