३० हजारांची लाच : कामठी पोलीस ठाण्यामागे कारवाई नागपूर : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याचा धाक दाखवून त्याच्याकडून ३० हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या शिकाऊ पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले. कामठी पोलीस ठाण्याच्या मागे आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. राजेश नारायणराव डाकेवाड (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो कळमेश्वर पोलीस ठाण्यात शिकाऊ पोलीस उपनिरीक्षक (प्रोबेशनरी पीएसआय) म्हणून कार्यरत आहे. एका महाविद्यालयीन तरुणाचे एटीएम कार्ड चोरून एकाने त्यातून रक्कम काढली होती. या प्रकरणाची तक्रार कळमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेल्यानंतर शिकाऊ (प्रोबेशनरी) पीएसआय डाकेवाडने चौकशी सुरू केली. एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचे छायाचित्र दाखविल्यानंतर तक्रारकर्त्या तरुणाने हा (कार्ड चोरून पैसे काढणारा) आपला मित्रच असल्याचे सांगितले. पीएसआय डाकेवाडने त्याला अटक केली. त्याचा पीसीआरही मिळवला. आरोपी मूळचा दारव्हा येथील रहिवासी आहे. पीसीआरदरम्यान डाकेवाड याने त्याला हिंगणा आणि भंडारा येथील अशाच एका गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ३० हजारांची लाच मागितली. हादरलेल्या आरोपीने दारव्ह्यातील आपल्या भावाला रक्कम घेऊन बोलवले. ३० हजार दिल्याशिवाय जामिनासाठी ‘ना हरकत’ देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. हिंगणा आणि भंडारा येथील गुन्ह्यात अडकविल्यास तुम्हाला दीड-दोन लाखांचा खर्च येईल, असाही धाक दाखवला. सरपंच, पीएसआय ते आरोपीलाचखोर डाकेवाडला त्याचा निर्ढावलेपणाच नडला. तो मूळचा नांदेडजवळचा रहिवासी आहे. पोलीस दलात रुजू होऊन त्याला एक वर्षही व्हायचेच आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची नियुक्ती नागपूर ग्रामीणमध्ये झाली. त्याला पहिली प्रोबेशनरी नियुक्ती हिंगण्यात देण्यात आली. तीन महिने तो हिंगण्यात होता; नंतर त्याला विशेष शाखेला संलग्न करण्यात आले. आता काही दिवसांपासून तो कळमेश्वरात कार्यरत आहे. पोलीस दलात दाखल होण्यापूर्वी तो गावचा सरपंच होता. परीक्षा दिल्यामुळे नंतर त्याची निवड पीएसआय म्हणून झाली. मात्र, लाचखोरीमुळे तो आरोपी बनला. बॅचमेटही अडचणीतआरोपीच्या भावाने लाचेची रक्कम कुठे घेऊन येऊ असे विचारले असता, आरोपीने त्याला कामठी पोलीस ठाण्याच्या मागे पोलीस क्वॉर्टरमध्ये येण्यास सांगितले. ड्रॅगन पॅलेसमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने डाकेवाड याची कामठीला बंदोबस्तावर ड्युटी लागली होती. कामठी पोलीस ठाण्यात डाकेवाडचा एक बॅचमेट तैनात आहे. त्यामुळे त्याच्या रूमवरच आरोपीच्या भावाला लाचेची रक्कम घेऊन बोलवले. ठरल्याप्रमाणे एसीबीचे कर्मचारीही लाचेची रक्कम नेणाऱ्यापासून विशिष्ट अंतरावर होतेच. डाकेवाडने रक्कम स्वीकारताच त्याच्या या पथकाने मुसक्या बांधल्या. या कारवाईमुळे डाकेवाडचा बॅचमेटही अडचणीत आला आहे.
लाचखोर पीएसआय अडकला
By admin | Updated: November 7, 2014 00:47 IST