विशेष न्यायालय : पाच हजाराची घेतली होती लाचनागपूर : पाच हजाराची लाच घेतल्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला (फौजदार) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. असगर अली अब्बास अली, असे या फौजदाराचे नाव असून लाचेच्या सापळ्याच्या वेळी तो सक्करदरा पोलीस ठाण्यात नेमणुकीस होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी, सोमवारी क्वॉर्टर बुधवारी बाजार चौकात राहणारे मोहम्मद यासीन ऊर्फ जिन्नात बाबा मोहम्मद याकूब यांचा भाचा मोहम्मद दानिश ऊर्फ गोलू जमील शेख याचा ३ मे २०११ रोजी अपघात होऊन मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास फौजदार अली याच्याकडे होता. मोहम्मद यासिन यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अपघात दावा करावयाचा असल्याने त्यांनी अपघात प्रकरणाच्या कागदपत्राची मागणी अली याच्याकडे केली होती. त्यावेळी असगर अली याने त्यांना , ‘तुम्हाला सहा-सात लाख रुपये मिळतील, त्यात माझा काय फायदा’, असा सवाल करीत कागदपत्रांसाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती. लाच द्यायची नसल्याने मोहम्मद यासीन यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी २३ मे २०११ रोजी मोहम्मद यासीन यांच्या सोमवारी क्वॉर्टर येथील घरी सापळा रचला होता. असगर अली याने लाचेच्या रकमेची मागणी करून स्वीकारताच त्याला रंगेहात अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक एच. आर. रेड्डीवार यांनी करून आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात पाच साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपी फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, ३ हजार रुपये दंड, कलम १३ (१)(ड), १३(२) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय लांबट तर आरोपीच्या वतीने अॅड. पी. के. मिश्रा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
लाचखोर फौजदाराला कारावास
By admin | Updated: April 30, 2016 02:59 IST