लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झिंग चढलेल्या मद्यपींकडून बारमध्ये तोडफोड होत असल्याचे पाहून सटकू पाहणाऱ्या दोन मद्यपींना बारच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरई बीअर बारमध्ये ही घटना घडली. संकेत नीळकंठ रहाटे (वय २३) आणि लोकेश पांडुरंग शंभरकर (वय २५) अशी जबर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.
हे दोघे रविवारी रात्री नंदनवनमधील सुरई बारमध्ये मद्य प्यायला गेले होते. दरम्यान, बाथरूमकडे जात असताना त्यांना काही जण तोडफोड करताना दिसले. ते पाहून हे दोघे घाबरले आणि लगबगीने बारच्या बाहेर जाऊ लागले. ते पाहून बारच्या वेटर आणि अन्य कर्मचाऱ्यांना त्यांचा संशय आला. बारमध्ये तोडफोड करणाऱ्या आरोपींचे हे साथीदार असावेत, असे समजून त्यांनी लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी संकेत तसेच लोकेशला बेदम मारहाण केली. यात हे दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, बारमध्ये झालेल्या हाणामारी आणि गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर नंदनवन पोलीस तेथे पोहोचले. जखमी संकेत तसेच लोकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर संकेतने दिलेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी बारमालक तसेच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
----