लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संक्रमणामुळे शाळा बंद आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र वाया जात आहे. याचा विचार करता लर्निंग फ्रॉम होम संकल्पना अंतर्गत मनपाच्या शाळातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अँड्रॉईड टॅब उपलब्ध करण्याची योजना शिक्षण विभागाने तयार केली आहे. मात्र अजूनही निविदा काढली नसल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणाचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
एज्युकेशन टॅब बँक प्रकल्पांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅब माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. सध्या मनपा शाळात इयत्ता दहावीत १७२३ तर बारावीत २१५ विद्यार्थी आहेत. दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण मिळावे. यासाठी योजना तयार केली आहे. परंतु अजूनही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत.
........
१९५० टॅब खरेदीचा प्रस्ताव
प्रती टॅब १०९८८ रुपये प्रमाणे मनपाला यावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च करावा लागेल.
संचालनासाठी मोबाईल कंपन्यांना दर महिन्याला प्रतीटॅबवर १५० रुपये खर्च करावा लागेल. यावर मनपाला ३५.१० लाख रुपये खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना दररोज १.५ जीबी डाटा उपलब्ध होईल. या प्रकल्पावर २ कोटी ४९ लाख ५६ हजार १०० रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
....
वर्षाच्या खर्चासाठी तरतूद
देखभाल व नेट पॅक यावर वर्षाला खर्च होणारे ६४.३५ लाख रुपये शिक्षण विभागाच्या कॉम्प्युटर, प्रिंटर्स, झेरॉक्स व अन्य खरेदी दुरुस्ती या पदातून प्रावधान करण्याची मागणी स्थायी समितीकडे केली होती. याला मंजुरी दिली आहे.
....
लवकरच निविदा काढणार
टॅब खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. याबाबतच्या निविदा लकरच काढण्यात येतील. मनपा शाळांतील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार नाही. असा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
प्रीती मिश्रिकोटकर, शिक्षणाधिकारी मनपा